| अलिबाग | प्रतिनिधी |
स्व. गजेंद्र दळी हे अलिबागमधील एक ज्येष्ठ उद्योजक होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी अलिबागमधील अनेक लघुउद्योगांना चालना दिली. समाजातील वंचित घटकासाठी कायम ते सक्रीय होते. त्यांच्या निधनाने अलिबागचे फार मोठे नुकसान झाले आहे. अलिबाग नगरपरिषदेच्या कारभारात त्यांचे वाखाणण्याजोगे योगदान होते. ते अलिबागचे सच्चे प्रेमी होते. अलिबागवर प्रेम करणारे खरे व्यक्तिमत्त्व होते. भाऊंनी अनेकांना व्यवसायात प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम त्यांनी कायमच केले आहे, असे प्रतिपादन शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी केले.

अलिबागचे ज्येष्ठ उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते स्व. गजेंद्र तुकाराम दळी यांच्या स्मरणार्थ अलिबागमध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली. लायन्स क्लब अलिबाग, ज्येष्ठ नागरिक संघटना अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील वेव्हज हॉटेलमधील सभागृहात गुरुवारी (दि.31) ही सभा घेण्यात आली. यावेळी मानसी म्हात्रे बोलत होत्या. यावेळी शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, लायन्स क्लबचे अनिल जाधव, अनिल चोपडा, ॲड. नीलम हजारे, शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी, सत्यजित दळी, विश्वजीत दळी व दळी कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मंडळींनी स्व. गजेंद्र दळी यांच्या कार्याची माहिती देत आदरांजली अर्पण केली.







