अलिबाग-रेवदंडा फेर्‍या सुरु

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग-मुरुड या दोन तालुक्यांना जोडणार्‍या रेवदंडा-साळाव पुलाच्या दुरुस्तीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु केले आहे. या पुलावरून पाच टनापेक्षा वाहनांना प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून एसटी सेवादेखील बंद करण्यात आली आहे. अलिबाग-मुरुडकडे जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी अलिबाग एसटी बस आगारातून अलिबाग-रेवदंडा अशा 30 एसटीच्या फेर्‍या सुरु करण्यात आल्या आहेत. प्रत्येक तासाला ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती अलिबाग आगार व्यवस्थापक अजय वनारसे यांनी दिली.

रेवदंडा-साळाव पुल जीर्ण झाल्याने त्या पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे होते. त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या पुलाची दुरुस्ती सुरु केली आहे. सावित्री पुलाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी या पुलाचे काम युध्द पातळीवर सुरु झाले आहे. मात्र या पुलावरून पाच टनापेक्षा अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. योेगेश म्हसे यांनी दिले. त्यानुसार प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या पुलावरून एसटी सेवा बंद करण्याच्या सुचना विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आल्या.

मात्र अलिबाग-मुरुडकडे ये-जा करणारे प्रवासी, विद्यार्थी व नोकरी व्यवसायनिमित्त असणारे कर्मचारी, नागरिक तसेच पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळ रायगड विभागाने पुढाकार घेत अलिबाग-रेवदंडा पर्यंत बसेस सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अलिबाग एसटी बस आगारातून एसटीच्या 30 फेर्‍या सुरु करण्यात आल्या आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ पर्यंत प्रत्येक तासाला बस स्थानकातून सुटणार आहे.

30 मार्चपासून ही सेवा सुरु केली असून त्याचा फायदा अलिबाग-मुरुडकडे ये-जा करणार्‍या प्रवाशांना चांगला होत आहे. प्रवासी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

एसटी फेर्‍यांवर नजर
अलिबाग-रेवदंडा सकाळी सहा
रेवदंडा-अलिबाग सकाळी सात
अलिबाग-रेवदंडा सकाळी आठ
रेवदंडा-अलिबाग सकाळी नऊ
अलिबाग-रेवदंडा सकाळी दहा
रेवदंडा-अलिबाग सकाळी अकरा
अलिबाग-रेवदंडा दुपारी बारा
रेवदंडा-अलिबाग दुपारी एक
अलिबाग-रेवदंडा दुपारी दोन
रेवदंडा-अलिबाग दुपारी तीन
अलिबाग-रेवदंडा सायंकाळी चार
रेवदंडा-अलिबाग सायंकाळी पाच
अलिबाग-रेवदंडा सायंकाळी सहा
रेवदंडा-अलिबाग सायंकाळी सात
अलिबाग-रेवदंडा रात्री आठ
रेवदंडा-अलिबाग रात्री नऊ

रेवदंडा-साळाव पुलाचे काम सुरु आहे. पाच टनावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी अलिबाग एसटी बस स्थानकातून रेवदंड्यापर्यंत नियमीत बस सेवा सुरु केली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार याची कार्यवाही तात्काळ करण्यात आली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत ही सेवा सुरु केली असून प्रत्येक तासाला एसटी बस सुरु आहे.

अजय वनारसे, अलिबाग एसटी बस आगार व्यवस्थापक
Exit mobile version