अलिबाग- रोहा रस्ता खचला

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मोठा गाजावाजा करीत अलिबाग-रोहा रस्त्याचे काम मागील वर्षी एप्रिल महिन्यात सुरु करण्यात आले. मात्र पहिल्याच पावसात हा रस्ता खचून गेला. त्यामुळे या रस्त्यावरील कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण होत आहे.

22 एप्रिल 2023 रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अलिबाग- रोहा रस्त्याचे काम सुरु करण्यात आले. शिंदे गट आणि भाजपमध्ये या कामाबाबत श्रेयवाद निर्माण झाला होता. बेलकडे फाट्यापासून कारपेट टाकण्याचे काम सुरु झाले. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावरील प्रवास सुखकर होण्याची आशा होती. मात्र पहिल्याच पावसात या मार्गावरील रस्ता खचल्याने प्रवाशांची घोर निराशा झाली आहे.

सहाण ते सहाण बायपास रस्त्याच्या बाजूकडील रस्ता खचला आहे. कावीर – सहाण गोठी जवळील मोरी तुटल्याने रस्ता पाण्यात जाण्याची भिती निर्माण झाली आहे. वढाव ते कुंठ्याची गोठी दरम्यान रस्ता पुर्णतः खचला आहे. रस्त्यावर टाकलेले कारपेट पुर्णतः निघाले आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात हा रस्ता खचल्याने वाहतूकीवर त्याचा परिणाम होण्याची भिती निर्माण झाली आहे. या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली आहे. रस्ता असाच खचल्यास या मार्गावरील वाहतूक बंद होण्याची चिंता प्रवाशांनी व्यक्त केली आहे. रुंदीकरणाच्या नावाखाली साईटपट्ट्यावर टाकलेली खडी बाहेर निघू लागली आहे. तसेच वेलवळी खानाव ते उसर पर्यतचा तयार करण्यात आलेल्या कॉक्रीट रस्ता अपूर्ण झाल्याने वाहतूकीवरही त्याचा परिणाम होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version