नातेवाईकानेच चोरी केल्याचा आरोप
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग शहरातील रामनाथ येथील घरातून सुमारे 7 लाख 77 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून ही चोरी नातेवाईकांनीच केल्याचा संशय आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे.
रामनाथ येथे प्रिती शिंदे यांच्या मालकीचे घर आहे. रविवारी (दि. 4) सायंकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत चोरट्याने घरात घुसून घरातील आयफोन, एटीएम कार्ड व रोख रक्कम असा एकूण 7 लाख 77 हजार रुपयांचा ऐवज चोरला. ही बाब तक्रारदार शिंदे यांच्या लक्षात येण्यापूर्वी चोरटा पसार झाला. ही चोरी त्यांच्या नातेवाईकांनीच केल्याचा संशय असून त्याचे घरात येणे-जाणे होते. त्यामुळे त्याच्याविरोधात शिंदे यांनी तक्रार नोंदविली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गून्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुळीक करत आहेत.