अलिबाग-विरार कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांच्या मोर्चा

विविध मागण्यांसाठी प्रांत कार्यालयावर धडक

| पनवेल | वार्ताहर |

अलिबाग-विरार कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पनवेल प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता. अलिबाग-विरार कॉरिडॉर बाधित शेतकरी संघर्ष समिती पनवेल आणि किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात शेतकऱ्यांच्या हिताचा 2013 चा सर्व कलमानुसार भूसंपादन कायदा लागू करा, केरळ राज्यापेक्षा अधिकचा जमिनीला दर द्या, तसेच बधितांसाठी पुनर्वसन पॅकेज जाहीर करा आदी मागण्या करण्यात आल्या.

अलिबाग-विरार कॉरिडॉर या बहुद्देशी महामार्गासाठी पनवेलमधील शेतकऱ्यांच्या जमीनी, राहती घरे, बागायती जमीनी संपादित केल्या जाणार आहेत. या भूसंपदनाला येथील शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली संघर्ष समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून पनवेलचे उपविभागीय व भूसंपादन अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. शेतकऱ्यांना गुंठ्याला केरळ राज्या पेक्षा अधिक दर द्या. कारण केरळमध्ये 34 लाख रुपये गुंठा दर असल्याचे पुरावे आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्र अधिक पुढारलेले राज्य आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळावा ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

या मोर्चा समोर किसान सभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, कामगार नेते कॉ. भूषण पाटील, किसान सभा सचिव संजय ठाकूर, शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी, उरण तालुका कॉरिडॉर बाधीत शेतकरी समितीचे सचिव रविंद्र कासुकर यांची भाषणे झाली. या मोर्चात पनवेल तालुका अलिबाग- विरार कॉरिडॉर संघर्ष समितीचे अशोक हुद्दार, सचिव जयेश गातारे, उपाध्यक्ष अशोक भोपी, सहसचिव नरेश परदेशी व शेतकरी उपस्थित होते.

Exit mobile version