मातीच्या भरावाने दुरूस्तीचा कारभार होत असल्याचा आरोप
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग-वडखळ महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरु आहे. हे काम योग्य पद्धतीने होत नाही, असा आरोप केला जात आहे. त्यात दुरुस्तीच्या नावाखाली मातीचा भराव टाकला जात असल्याचेही बोलले जात आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत वादाच्या भोवऱ्यात सापडलेला अलिबाग-वडखळ राष्ट्रीय महामार्ग पुन्हा चर्चेत आला आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराबाबत प्रवाशी वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे.
अलिबाग-वडखळ हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. पिंपळभाट, राऊतवाडी, खंडाळे, चेंढरे बायपास, तिनविरा ते चरी अशा अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे नकोसे झाले आहे. हे खड्डे चुकवताना अनेकवेळा अपघात झाले आहेत. त्यामध्ये या महामार्गावरून क्षमतेपेक्षा अधिक वजनाच्या अवजड वाहतूकीमुळे महामार्गाची परिस्थिती बिकट झाली आहे. खराब रस्त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे अर्ध्या तासाचे अंतर पार करण्यासाठी दिड तासांचा कालावधी लागत आहे.
दरम्यान, अलिबाग तालूका रस्ते संघर्ष समितीने या खराब रस्त्यांच्या विरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर रस्त्याची दुरुस्ती करण्यास सुरुवात झाली. परंतु, रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत शेकाप प्रवक्ता तथा सोशल मिडिया सेलच्या अध्यक्ष चित्रलेखा पाटील व शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी ठेकेदाराला जाब विचारला. त्यानंतर पिंपळभाटपासूनचे खड्डे खडी व डांबरीकरण करून बुजवण्यात आले. मात्र, खंडाळेपासून पुढील खड्डेमय रस्त्यांवर मातीचा भराव टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी जेसीबीच्या मदतीने माती खड्ड्यात टाकण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अलिबाग-वडखळ या महामार्गासांठी सुमारे 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या महामार्गाच्या कामाचा ठेका देवकर अर्थमुव्हर कंपनीला देण्यात आला असून, या कंपनीच्या ठेकेदारामार्फत खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे.
अर्थमुव्हर कंपनीला अलिबाग-वडखळ महामार्गाचे काम दिले आहे. त्या कंपनीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. परंतु, रस्त्याची साईटपट्टी उंच झाल्याने पाऊस रस्त्यावर साचत आहे. परिणामी डांबरीकरण करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. सध्या साईटपट्टी स्वच्छ करण्याचे काम केले जात आहे. त्यानंतर डांबरीकरण करून रस्ता योग्य केला जाईल.
शैलेंद्र गुंड,
कार्यकारी अभियंता,
राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग, वडखळ







