अलिबाग-वडखळ रस्त्याचे दुपदरीकरण होणार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग वडखळ रस्ता राज्य महामार्गाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. गेल्या आठवडयात आपण स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. चार पदरी रस्त्याचे काम थांबले असल्योन सध्या सदर रस्ता दोन पदरी करण्याची मागणी केली. त्यानुसार त्यांनी मान्यता दिल्याने वडखळ अलिबाग रस्ता दोन पदरी होणार असल्याची माहिती देतानाचा यासंदर्भात आपण कालच हायवेच्या मुख्य अभियंत्यांसोबत बैठक घेतली असून लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिली.

नागाव येथील सचिन राऊळ मित्र मंडळ आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत जेएसडब्ल्यू संजिवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने नागाव बंदर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते.

त्याचे उद्घाटन केल्यानंतर मार्गदर्शन करताना आ.जयंत पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या भागाचा वेगळया पद्धतीने विकास करण्याचा आपला मानस आहे. सीआरझेड उठविण्याचा आपला प्रयत्न आहे. बैल खिंड रस्ता आप्पासाहेबांच्या पेट्रोलपंपापर्यंत आणि तिथून पालवमध्ये येईल आणि तिथून मधून बंदराकडे नेऊन समुद्रकिनारी रेवदंड्याच्या साळाव पुलापर्यंत नेणार आहोत. साळावच्या पुलाला देखील आपण मंजुरी मिळवली आहे. सदर जागा कोर्लईकडून नेण्याचा प्रयत्न आहे. नागावसाठी खास रस्ता करुन पर्यटनाला जास्तीत जास्त वाव मिळण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे आ.जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

अलिबाग तालुका पर्यटनाच्या दृष्टीने हब होणार आहे.
जयंत पाटील यांनी यावेळी आवर्जून सचिन राऊळ यांना धन्यवाद दिले. आरोग्य शिबीराचा दर्जा दिवसेंदिवस वाढला पाहिजे. आरोग्य शिबीर फक्त उपक्रम म्हणून दाखवण्यापेक्षा ते मनापासून झाले पाहिजे. सचिन राऊळ चांगल्या प्रकारे सामाजिक काम करत आहेत. शेकापक्षाची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपविली आहे. जेणेकरुन पक्षाचे वेगळ्या तर्‍हेचे काम तरुण पिढीने केले पाहिजे. अशी शिबीरे होत असल्याबाबत कौतुक अशी आरोग्य शिबीर गरीबांसाठी आयोजित करायला हवीत. प्रत्येकाने आरोग्याचा विमा उतरविला पाहिजे. अलिबागला अद्यावत रुग्णालय होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी जयंत पाटील म्हणाले. या शिबीराला परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत 132 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. या प्रसंगी शेकापक्षाचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रदीप नाईक,  माजी सरपंच नंदकुमार मयेकर, सदानंद गायकवाड, राकेश राणे, प्रसाद सुतार, संतोष राऊळ, रुपेश पाटील, नितीन पाडेकर, नागाव ग्रामपंचायत सदस्य परेश ठाकुर, माजी सदस्य  विकास पिंपळे, आणि दर्यावर्दी मित्र परिवार  ग्रामस्थ आणि चिंतामणी मित्र परिवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version