वाहनांच्या लांबच लांब रांगा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नाताळनंतर थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये पर्यटक शुक्रवारापासून येण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी अलिबाग-वडखळ, अलिबाग-नागाव, अलिबाग- रेवदंडा मार्गावर वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांसह पर्यटकांना बसला. ही वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक झाली. अपुऱ्या मनुष्यबळामुळे होमगार्डचीदेखील मदत घेण्यात आली. मात्र, ही वाहतूक कोंडी सोडविण्यास फारसे यश आले नाही. पर्यटकांना त्यांच्या निश्चितस्थळी पोहोचण्यास विलंब झाला. त्यामुळे प्रवासी व पर्यटकांमध्ये नाराजीचे सूर उमटले. ऐन पर्यटनाच्या हंगामात रस्त्यांची कामे करण्यासाठी खोदकाम केल्याने त्याचाही फटका प्रवाशांना व व्यावसायिकांना बसल्याचे दिसून आले आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष रायगड जिल्ह्यात साजरा करण्याचा निर्णय पर्यटकांनी यंदाही घेतला आहे. मागील महिन्याभरापासून हॉटेल, कॉटेजेस पर्यटकांनी बुकिंग सुरू केली होती. 28 डिसेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंत सर्वच हॉटेल्स बुक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे यावर्षीदेखील पर्यटकांनी रायगड जिल्ह्याला पसंती दर्शविली असल्याची माहिती समोर आली आहे. सागरी मार्गासह रस्त्यानेदेखील पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल झाले. मुंबई-गोवा महामार्गासह रायगड जिल्ह्यातील अलिबाग-वडखळ, अलिबाग-मुरूड, अलिबाग-नागाव रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा होत्या. अलिबाग ते बेलकडे हे दहा मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते एक तास लागला. त्यामुळे पर्यटकांना त्यांच्या निश्चितस्थळी वेळेवर पोहोचता आले नाही. जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याने ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक उडाली. वाहतूक पोलीस अपुऱ्या मनुष्यबळाला मदत म्हणून दोनशे होमगार्डची मदत घेण्यात आली. तरीदेखील ही वाहतूक कोंडी सोडविण्यास यंत्रणा अपयशी ठरल्याचे बोलण्यात आले आहे.
बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत संताप अलिबाग-रोहा मार्गावरल ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन ठरले. या खड्ड्यांतून मार्ग काढताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा फटका प्रवाशांसह पर्यटकांना बसला. तसेच, ऐन पर्यटनांच्या हंगामात ठिकठिकाणी रुंदीकरणाच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवले आहेत. अलिबागमधील सहाण बायपास व इतर भागातील रस्ते खोदून ठेवल्याने धुळीचा त्रास तसेच वाहनांचा वेगही मंदावला आहे. बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी होमगार्डची मदत घेण्यात आली. अलिबाग-वडखळ, अलिबाग-बेलकडे मार्गावर ठिकठिकाणी वाहतूक पोलीस आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी पर्यटनस्थळे आहेत, त्या भागातही पोलीस तैनात केले आहेत. अलिबाग-बेलकडे मार्गावर ठिकठिकाणी खड्डे असल्याने वाहनांचा वेग मंदावला. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. ही कोंडी सोडविण्याचा प्रयत्न यंत्रणेद्वारे करण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक पोलिसांचीदेखील यासाठी मदत घेतली आहे.
अभिजीत भुजबळ, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा




