जिल्हा महिला आघाडी प्रमुखानंतर तालुका महिला संघटिकाचा राजीनामा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शिवसेना शिंदे गटात कार्यरत असलेल्या जिल्हा महिला संघटिका शुभांगी करडे यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिल्यानंतर आता तालुका महिला संघटिका स्मिता चव्हाण यांनीदेखील राजीनामा दिला आहे. पक्षात मानाचे स्थान मिळत नसल्याने सर्वच पदाधिकारी नाराज असून, त्यामुळेच राजीनामा सत्र सुरू असल्याचे बोलले जाते.
काही महिन्यांपूर्वी कसलाही राजकीय वा संघटनात्मक अनुभव नसलेल्या एका महिलेला जिल्हा संघटिका म्हणून थेट पद दिल्याने महिला पदाधिकार्यांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार झाले होते. याच रागातून जिल्हा महिला आघाडी संघटिका शुभांगी करडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
पक्षात अपमानास्पद वागणुकीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करीत दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या भूमिकेमुळे महिला आघाडीमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता अलिबाग तालुका महिला संघटिका स्मिता चव्हाण यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा थेट आ. महेंद्र दळवी यांच्याकडे दिला आहे. त्यांनी राजीनामा देताना आपण प्रामाणिकपणे पक्षाचे काम केल्याचे सांगत राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. मात्र, पक्षातील पदाधिकारी महिलांना मान देऊ शकत नसलेले आमदार मतदारसंघातील महिलांना काय मान देतील? अशी चर्चा महिला पदाधिकार्यांमध्ये सुरु आहे.