शेकाप विरुद्ध सर्व पक्ष हीच शेकापची ताकद- माजी आ. पंडित पाटील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हा एक प्रमुख पक्ष होता त्याचे अस्तित्व आज दिशाहिन झालेले आहे. अलिबागमध्ये सर्वपक्ष विरुद्ध शेकापक्ष ही परंपरा आजही कायम राहिली. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपानेदेखील निवडणूकीत भाग घेतला नाही. त्यामुळे जे लोकं शेकापक्ष कुठे आहे. आमदारकी मिळेल की नाही असे प्रश्‍न विचारणारे, आमदारकीचे उमेदवार आहेत कुठे असा सवाल शेकापक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केला आहे.
ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीच्या मतमोजणीनंतर निकालाचे विश्‍लेषण करताना पंडित पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, राष्ट्रीय पक्ष असणार्‍या काँग्रेसचे नेेते माजी आमदार मधूकर ठाकूर यांची अलिबाग तालुक्यात ताकद होती. मात्र दुर्दैवाने त्यांच्या निधनानंतर आज काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील अस्तित्व धोक्यात आले असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. शेकापक्ष आहे कुठे हे विचारणार्‍यांना मतदारांनीच उत्तर दिले असल्याचेही ते म्हणाले. आजही शेकाप विरुद्ध सर्व पक्षांना एकत्र यावे लागते हीच शेकापची ताकद असल्याचेही त्यांनी सांगितले.
अलिबाग तालुक्यामध्ये 1992 पासून शेकाप विरोधात जी आघाडी विरोधी पक्षांनी केली ती आजही कायम आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणवणार्‍या भाजपा सारख्या पक्षांनी देखील आपले उमेदवार उभे केले नाही. काँग्रेसचाही एक उमेदवार नाही आमदार होत त्यांनी स्वतःच्या पक्षाचा एकही उमेदवार नाही. मात्र शेकापक्षाचा मतदार कायम पक्षाच्या सोबतच आहे हे आजच्या पोटनिवडणूकीच्या निकालातून स्पष्ट झाले. मागील वेळी आमचा विश्‍वासघात झाला आम्ही बेसावध राहीलो. मात्र आजही शेकापक्षाची ताकद कायम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचेही ते म्हणाले. शेवटी पंडित पाटील यांनी या निवडणूकीत विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत मतदारांचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version