कै.गोकुळशेठ पाटील यांची सर्वपक्षीय शोकसभा

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल काँग्रेसचे लढाऊ नेते कै.गोकुळशेठ शनिवार पाटील यांचे शुक्रवार दि. 16 फेब्रुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते पनवेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांचे वडील असून राजकारणासह सामाजिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती. शनिवार (दि.24) फेब्रुवारी कै.गोकुळशेठ पाटील यांच्या पवित्र स्मृतींना शब्दसुमनांनी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

कै गोकुळशेठ पाटील हे रोडपाली गावचे दहा वर्ष सरपंच होते. त्याचबरोबर पनवेल काँग्रेस तालुकाध्यक्षपदी त्यांनी तब्बल वीस वर्ष निष्ठेने व तितक्याच धडाडीने काम केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे ते निकटवर्तीय होते. त्याचबरोबर काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे ते विश्‍वासू कार्यकर्तेही होते. असे असले तरीही सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान होते.

ह.भ.प.कै.गोकुळशेठ पाटील यांचा राजकारणासह पारमार्थिक कार्यक्रमात विशेष सहभाग असायचा. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव, दानशूर वृत्ती असून गावातील गरजू ,गरीब लोकांना नेहमीच ते सढळ हस्ताने मदतीचा हात द्यायचे. गावातील लहानापासून मोठ्यापर्यंत त्यांच्या प्रति आदर होता. राजकारणातील एक अजातशत्रू नेता म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती. त्यांच्या निधनाने सर्व राजकीय पक्षातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

या धर्तीवर कै.गोकुळशेठ पाटील यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्यासाठी शनिवारी दुपारी 04.30 वाजता रोडपाली येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणीक, व्यापारी बंधू-भगिनींनी स्व. गोकुळ शनिवार पाटील यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन सर्वपक्षीय व ग्रामस्थ मंडळ, रोडपाली यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version