नेरळ आनंदवाडी केंद्रामध्ये सर्व कर्मचारी दिव्यांग

| नेरळ | प्रतिनिधी |

मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत विधानसभा मतदारसंघात हरित मतदान केंद्र, महिला कर्मचारी असलेले गुलाबी मतदान केंद्र आणि दिव्यांग कर्मचारी असलेले मतदान केंद्र बनविण्यात आली होती. त्यात कर्जत तालुक्यातील नेरळ येथील आनंद वाडी केंद्र हे दिव्यांग कर्मचारी केंद्र होते. दरम्यान, या केंद्रावर विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक दिव्यांग मतदार असल्याने असा प्रयोग या मतदान केंद्रावर करण्यात आला होता.

कर्जत विधानसभा मतदारसंघात दिव्यांग मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वाधिक दिव्यांग मतदार आनंद वाडी केंद्रामध्ये असल्याने येथे दिव्यांग कर्मचार्‍यांची नियुक्ती निवडणूक विभागाने केली होती. नेरळ ग्रामपंचायतीमधील 81 नंबर चे मतदान केंद्र असलेल्या आनंद वाडी केंद्रावरील सर्व निवडणूक कर्मचारी हे दिव्यांग होते. त्या विभागाचे झोनल अधिकारी म्हणून कर्जत भात संशोधन केंद्रातील अधिकारी डॉ. रवींद्र मर्दाने, तर त्यांच्या मदतीला मतदान केंद्रप्रमुख म्हणून कैलाश घाडके, तर सहायक म्हणून नितीन मच्छिंद्र भानवसे, रमेश विठ्ठल संतपाल, जनार्दन नारायण तांबे आणि शिपाई म्हणून प्रभाकर पंढरीनाथ कर्णुक तर बीएलओ म्हणून काम करणारे कर्मचारीदेखील अपंग होते आणि त्यांनी निवडणूककामी मदत केली. दुपारी मतदान प्रक्रिया सुरू असताना मावळ लोकसभेच्या कर्जत विधानसभा मतदारसंघ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांनी भेट देऊन पाहणी केली.

Exit mobile version