कर्जतमधील सर्व शिक्षक सामूहिक रजेवर

। नेरळ । वार्ताहर ।

शिक्षक म्हणून आम्हाला मुलांना शिकवायचे आहे आणि आम्हाला तेच काम करू द्यावे, या मागणीसाठी राज्यातील जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक दि.5 रोजी सामूहिक रजेवर जात आहेत. कर्जत तालुक्यात देखील जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक हे शिक्षकदिनी सर्व शिक्षक सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत. त्यावेळी शाळेत विद्यार्थी उपस्थित असतील पण शिक्षक हजर नसतील.

राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रदीर्घ काळ प्रलंबित आहे. शासनाच्या वित्त, शालेय शिक्षण, ग्राम विकास, नगर विकास विभागाकडून इतर शासकीय कर्मचारी आणि खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शिक्षकांना दुय्यम दर्जाची, सापत्रभावाची वागणूक देण्यात येत असल्याच्या अनेक बाबतीत प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यात शिक्षकांवर विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबरच अशैक्षणिक कामे आणि ऑनलाईन माहिती पाठविण्याची कामे लादली जात आहेत. या मागण्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कडून राज्यभरात दि.15 जुलै रोजी धरणे-निदर्शने केली होती.

त्यांची दखल न घेतली गेल्याने शिक्षक दिनी राज्यातील सर्व शिक्षक हे सामूहिक रजेवर जाणार आहेत. याबाबत शिक्षक संघटनेने मुख्यमंत्र्यांपासून ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना निवेदने दिले आहे अशी माहिती शिक्षक समितीचे राज्य कार्यालयीन चिटणीस संदीप पाटील यांनी दिली आहे.

Exit mobile version