। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
लोकाभिमुख प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षात स्थापनेपासून आतापर्यंत एकूण 1 हजार 479 तक्रारी अर्ज प्राप्त झाले. हे सर्व अर्ज निकाली काढण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त महसूल तथा कोकण विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी मकरंद देशमुख यांनी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयातील पहिल्या मजल्यावरील कक्ष क्रमांक 117 मध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापित करण्यात आले. दि. 20 जानेवारी 2020 ते दि. 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत कोकण विभागाच्या विविध ठिकाणांहून मुख्यमंत्री यांना संबोधून करण्यात येणारे अर्ज, निवेदने असे एकूण 1 हजार 479 अर्ज प्राप्त झाले होते. त्याप्रैकी 512 अर्ज क्षेत्रिय कार्यालयांकडे पाठविण्यात आले. 230 अर्ज मुंबई येथील मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयाकडे पाठविण्यात आले आणि 737 अर्ज क्षेत्रिय कार्यालयाकडून निकाली काढून घेण्यात आले आहेत.
कोकण विभागात एकूण 152 प्रमुख क्षेत्रिय कार्यालये आहेत. त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे 173 तक्रारी अर्ज हे नवी मुंबई महानगरपलिके संबंधित होते, तर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित 112 अर्ज होते आणि नवी मुंबईतील सिडको संबंधित 121 तक्रारी अर्ज होते.