मविआच्या सर्व पक्षांनाआमदार निधीतून समान वाटा देणार- जयंतभाई पाटील

| मुरूड-जंजिरा | प्रकाश सद्रे |

चित्रलेखा पाटील यांची उमेदवारी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आग्रही मागणी केल्यामुळे देण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनीच माझ्यावर दबाव आणला म्हणूनच मी अलिबाग मतदारसंघातून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्या निवडून आल्यास विधानसभेत माझ्यापेक्षाही जास्त आवाज उठवतील, याबाबत माझ्या मनात शंका नाही. एवढेच नाही तर, त्यांना मिळणार्‍या आमदार निधीतून महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांना समान वाटा देणार, हा माझा शब्द आहे, असे आश्‍वासन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी गुरुवारी (दि.14) रोजी मुरूड तालुक्यातील नांदगावमध्ये बोलताना दिले.

नांदगावमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे उमेश ठाकूर, अ‍ॅड. इस्माईलभाई घोले, शिवसेना उबाठा गटाचे प्रशांत मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नौशाद शाबान, अस्लम हलडे, सरपंच सेजल घुमकर, विजय हिंदी, सुदेश घुमकर, नरेश कुबल, रिझवान फहीम, माजी सभापती चंद्रकांत कमान, प्रणिता पाटील, योगेश पाटील, इम्तियाज मलबारी, विक्रांत कुबल आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

बॅ. अंतुलेंसारखा सेक्युलर नेता मी पाहिला नाही. ते मुख्यमंत्री असताना आम्ही कट्टर विरोधक होतो. असे असतानाही अंतुलेंनी आमच्या संस्थेला दोन शाळा उघडण्याची परवानगी दिली. त्यावेळी विरोध करणार्‍या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी जेथे गरीबांची मुले शिकणार असतील, तर मी कोणत्याही विरोधकाला शाळा परवानगी देण्यास तयार आहे. ही त्यांची गरीबांबद्दल असलेली कणव आणि हाच खरा सर्वधर्मसमभाव जपला. बॅ. अंतुलेंनी ज्यांना मोठे केले, ते त्यांना सोडून गेल्याचे मोठे दुःख त्यांना होते. श्रीवर्धन मतदारसंघातून काँग्रेसच्या मुश्ताक अंतुलेंना तिकीट देण्यात येणार होते, खर्चही मी करेन, असेही सांगितले होते. पण, ते पक्ष सोडून तटकरेंच्या गोटात सामील झाले. हे दुर्दैवी आहे. अंतुले माणूस म्हणून काय होते हे मुश्ताकला कळू नये, याचे आश्‍चर्य वाटते. बॅ. अंतुलेंनी कौटुंबिक नाते कायमच जपले, असेही जयंत पाटील म्हणाले.

मी काँग्रेसभवनात गेलो, कारण आता आम्हाला आघाडीच्या सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन काम करायचे आहे. या निवडणुकीत शेकापपेक्षा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अधिक जोमाने काम करीत आहेत. शेकापची मते ठाम राहतात, ती फुटत नाहीत. घटक पक्षांची मते बरोबर पडल्यास चित्रलेखा पाटील किमान पन्नास हजारांच्या फरकाने निवडून येतील. तेव्हा निकालाच्या दिवशी मुरुड तालुक्यातील आघाडीच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी गुलाल उधळण्यास अलिबागला यावे, असे निमंत्रणही त्यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी शिवसेनेचे नेते प्रशांत मिसाळ यांचेही भाषण झाले. आमदारांच्या बॅनरवरील किती कामे प्रत्यक्षात झाली आहेत. मुरुड शहर सोडल्यास ग्रामीण भागातील विकास रखडलेलाच आहे. या निवडणुकीत उबाठा सेनेचे कार्यकर्ते गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाहीत. अ‍ॅड घोले यांनी नांदगावमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आघाडीच्या स्वरूपातच सर्व निवडणुका लढविल्या जातात, असे सांगितले. अस्लम हलडे यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

Exit mobile version