कर्जतमधील सर्व पाझर तलाव भरले

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद आणि राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाने पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी करण्यासाठी आणि दुबार शेतीसाठी बांधलेले मातीचे पाझर तलाव हे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले आहेत. तालुक्यात सहा ठिकाणी पाझर तलाव तर दोन ठिकाणी मातीची धरणे असून एका ठिकाणी लघुपाटबंधारे प्रकल्प आहे. दरम्यान, हे सर्व पाणीसाठे पूर्ण भरले असल्याने यावर्षी त्या त्या भागातील पाण्याची समस्या कमी होणार आहे.

तालुक्याच्या वासरे परिसरात खांडपे भागात 1983 मध्ये पाझर तलावाची निर्मिती झाली. 642 सहस्त्र घनमीटर पाण्याचा साठा एवढी क्षमता असलेल्या खांडपे पाझर तलावाच्या पाण्यावर भाताची दुबार शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.तर ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर 1988 मध्ये मातीचे धरण बांधण्यात आले.

आर्डे येथे असलेल्या धरण देखील गाळ आणि माती यांनी भरले असल्याने त्यात देखील पाणी साठा अत्यल्प असतो.तर 1989 मध्ये डोंगरपाडा येथे पाझर तलाव बननधान्यात आला. या तलावाचे पाझरणारे पाणी पुढे वारे पर्यंतच्या नाल्यापर्यंत जात असल्याने या पाझर तलावाचा उपयोग शेतकरी वर्गाला चांगला होत असतो. मात्र 2011 मध्ये हा पाझर तलाव फुटून गेल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि जमिनीचे नुकसान झाले होते.त्यानंतर तात्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी तब्बल पाच कोटींचा निधी मंजूर केल्याने पुन्हा हे धरण नव्याने उभे राहिले आहे.

1990 मध्यें नेरळ- कळंब रस्त्यावर वरई येथे मातीचे धरण बांधण्यात आले असून हे धरण सर्वात शेवटी ओव्हरफ्लो होत असते.त्या धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता 671 सहस्त्र घनमीटर एवढी आहे.तर त्याच काळात बलीवरे येथे देखील जंगल भागात मातीचे धरण बांधण्यात आले होते. 351 सहस्त्र घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या या मातीच्या धरणात देखील पूर्ण क्षमतेने पाणी आहे. तालुक्यात पाषाने येथे आणि रेल्वे पट्ट्यात पाली भूतिवली येथे लघुपाटबंधारे प्रकल्प उभे केले. या सर्व प्रकल्प क्षेतारत चांगले पाणी झाल्यामुळे त्या ठिकाणी देखील जलाशय फुल्ल झाले आहेत.

धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने सर्व पाझर तलाव भरून वाहू लागले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण परिसराची पाहणी आम्ही करीत असतो जेणेकरून कोणताही धोका उद्भवू नये.

-सुरेश इंगळे, उपअभियंता, जि.प लघुपाटबंधारे विभाग

Exit mobile version