जेएनपीएचे सर्व व्यवहार होणार डिजिटल

बंदराचा बडोदा बँकेससोबत करार
उरण । वार्ताहर ।
जेएनपीएने बँक ऑफ बडोदासोबत करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारा अंतर्गत बँक ऑफ बडोदातर्फे जेएनपीए बंदर प्राधिकरणास डिजीनेक्स्ट कॅश मॅनेजमेंट सेवा प्रदान करण्यात येणार आहे. तसेच बंदर प्राधिकरणाची देयके, संकलन आणि लिक्विडिटी व्यवस्थापन डिजिटल होणार आहे.

जेएनपीएला डिजिटल परिवर्तनाचे संपूर्ण फायदे प्राप्त करून देण्यास मदत करण्यासाठी बँक ऑफ बडोदाने बडोदा डिजिनेक्स्टचे सॅप प्रणालीसोबत यशस्वीरित्या इंटीग्रेशन केले आहे. यामुळे पहिल्या टप्प्यात जेएनपीएला देय खात्यांचे डिजिटायझेशन आणि स्वयंचलित करण्यात मदत होईल. सर्व पेमेंटची स्थिती जेएनपीएच्या ईआरपी सिस्टीममध्ये अद्ययावत केली जाईल. पेमेंट सल्ला आणि एसएमएस अलर्ट बडोदा डिजीनेक्स्टद्वारे थेट पेमेंटच्या लाभार्थ्यांना पाठवले जातील. जेएनपीएमधील सर्व सेवा जागतिक मानकांच्या बरोबरीने असल्याने तांत्रिक प्रगती आणि कार्यक्षमता हे नेहमीच जेएनपीएच्या केंद्रस्थानी राहिली आहे.

या नवीन सेवेबाबत बोलताना जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले की, जेएनपीएमध्ये स्थापित केलेल्या सॅप प्रणालीचे उद्दिष्ट सर्व व्यावसायिक व्यवहारांच्या जलद अंमलबजावणीसाठी व्यवसायातील नवनवीन शोधांना चालना देणे आहे. यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी व जेएनपीएचे डिजिटायझेशन एका व्यापक स्तरावर नेण्यासाठी तसेच जेएनपीएचा व्यवसाय अधिक संघटित, स्वयंचलित आणि कार्यक्षम बनवण्यासाठी बँक ऑफ बडोदाशी त्यांच्या बडोदा डिजिनेक्स्ट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेसचा लाभ घेण्यासाठी करार केला आहे. डिजिटायझेशन आणि व्यवसाय करणे सुलभ करण्याचा एक भाग म्हणून हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version