द्रविडचे कर्णधाराला सहकार्य नसल्याचा आरोप

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड कर्णधाराला सहकार्य करत नसल्याचा आरोप माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल याने केला आहे. 2021च्या टी-20 विश्वचषकानंतर राहुल द्रविडने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून भारतीय संघाने दोन आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी गमावली. टी-20 विश्वचषक 2022च्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीच्या अंतिम फेरीतही संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला.

याशिवाय भारतीय संघाने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावली. बांगलादेशला गेलो आणि तिथेही एकदिवसीय मालिका गमावली. आता वेस्ट इंडिजमध्ये काय स्थिती आहे हे सर्वांसमोर आहे. या सगळ्यानंतर काही चाहते द्रविडवर सोशल मीडियावर टीका करत आहेत. आता यामध्ये त्याच्यासोबत खेळलेल्या एका सहकारी क्रिकेटपटूनेही त्याच्या कोचिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या वरिष्ठ द्रविडसोबत दीर्घकाळ खेळणाऱ्या पार्थिवने हार्दिकच्या कर्णधारपदावर होणाऱ्या परिणामाचा उल्लेख करत द्रविडवर प्रश्न उपस्थित केले. हार्दिक पांड्याने ज्या प्रकारे आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधारपद भूषवले आणि कोच आशिष नेहराने त्याला पाठिंबा दिला. अशा प्रकारे, कदाचित पांड्याला टीम इंडियामध्ये राहुल द्रविडचा पाठिंबा मिळत नाही. विशेष म्हणजे हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर आणि त्याच्या चुकांवर सातत्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पार्थिव पटेल म्हणाला की, या मालिकेदरम्यान हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदात अशा दोन चुका झाल्या होत्या ज्या चर्चेचा विषय आहेत. पहिल्या सामन्यात निकोलस पूरन आक्रमण खेळत असताना अक्षर पटेलला ओव्हर दिली पण त्यानंतर युझवेंद्र चहलला ओव्हर दिली नाही. पार्थिव पुढे म्हणाला की, गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. तिथे त्याला आशिष नेहराचा पाठिंबा मिळला होता, पण राहुल द्रविड कदाचित टी-20 फॉरमॅटसाठी या भूमिकेसाठी योग्य वाटत नाही. येथे आपल्याला अशा व्यक्तीची गरज आहे जी सक्रिय असेल. हार्दिकच्या आत ठिणगी आहे, पण त्याला सपोर्ट हवा आहे जो कदाचित त्याला राहुल द्रविडकडून मिळत नसेल, असा दावाही त्याने व्यक्त केला आहे.

Exit mobile version