अनिल देशमुख यांच्यावरील आरोप निकालात?; चौकशीत नवा ट्विस्ट

। मुंबई । प्रतिनिधी ।
चांदीवाल आयोगाकडून 100 कोटींच्या खंडणीप्रकरणात मंगळवारी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चांदीवाल आयोगाकडून चौकशी करण्यात आली. यावेळी अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांना समोरासमोर बसवून प्रश्‍न विचारण्यात आले. तेव्हा सचिन वाझे याने आपण अनिल देशमुख यांना कधीही पैसे दिले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आपण अनिल देशमुख यांच्या कोणत्याही सहकार्‍यांनाही पैसे दिले नसल्याचे वाझे याने सांगितले. त्यामुळे याप्रकरणात अनिल देशमुख यांच्यावरील आरोप निकालात निघण्याची शक्यता वाढली आहे.

याप्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांचे खासगी सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांनाही अटक केली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही आपल्या पत्रात या दोघांच्या माध्यमातून खंडणी गोळा केली जात असल्याचा आरोप केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच परमबीर सिंग यांनी आपल्याकडे तसे कोणतेही पुरावे नसल्याचे म्हटले होते. त्यापाठोपाठ आता सचिन वाझे यानेही आपण अनिल देशमुख यांना आपण कोणतेही पैसे दिले नसल्याची कबुली दिली आहे.

परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणामुळे महाविकासआघआडीची मोठी नाचक्की झाली होती. काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख मईडीफसमोर हजर झाले होते. त्यानंतर चौकशी करुन मईडीफने अनिल देशमुख यांना अटक केली होती.

तत्पूर्वी मुंबई गुन्हे शाखेकडून सचिन वाझे आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात न्यायालयात नुकतेच 1895 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा करण्यात आला होता. गुन्हे शाखेकडून अनेक पोलीस अधिकारी आणि हवालदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते. त्यामध्ये पोलीस अधिकार्‍यांनी, खंडणीसाठी बारमालकांना धमकावण्यासाठी सचिन वाझे हा आपल्यावर दबाव आणत असल्याचे म्हटले.

खंडणी गोळा करायला नकार दिला तर संबंधित पोलीस अधिकार्‍याला नोकरी घालवण्याची भीती घातली जात असे. एखाद्या पोलीस अधिकार्‍याने खंडणीवसूली रोखण्याचा प्रयत्न केला तर सचिन वाझे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे तक्रार करेन, असे सांगायचा. अनेक पोलीस अधिकार्‍यांनी तसे जबाब नोंदवले आहेत. सचिन वाझे आम्हाला त्याच्या मनाप्रमाणे काम करायला भाग पाडायचा. मला वरुन तसे आदेश देण्यात आले आहेत, असे सांगायचा. त्यानंतरही कोणी नकार दिला तर सचिन वाझे त्याला दुष्परिणाम भोगण्यासाठी तयार राहा, अशी धमकी द्यायचा, असे गुन्हे शाखेच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version