नेरळ ग्रामपंचायत प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप

गैरव्यवहाराविरोधात उपोषणाचा इशारा

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ ग्रामपंचायतमधील नळजोडणी गैरव्यवहार तसेच प्रशासकांच्या कथित गैरकारभार आणि पाण्याच्या नियोजनातील भ्रष्टाचाराच्या विरोधात कर्जत पंचायत समितीचे सदस्य आणि माजी सरपंच भगवान बाळकृष्ण चंचे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराची नि:पक्षपातीपणे चौकशी न झाल्यास येत्या 6 एप्रिलपासून नेरळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात चंचे यांनी कर्जतचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांना लेखी निवेदन सादर केले आहे.

भगवान चंचे यांनी आपल्या निवेदनात प्रशासक काळातील अनेक गंभीर बाबींवर बोट ठेवले आहे. प्रशासक काळात अनेक ठिकाणी पाणी कनेक्शन देण्यात आले, त्यातून लाखो रुपयांची उलाढाल झाली. मात्र, त्यातील एक रुपयाही ग्रामपंचायतीच्या तिजोरीत जमा झाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, ग्रामसभेचा विरोध डावलून ममदापूर भागातील बिल्डरांना पाणी पुरवण्यात आले. संबंधित बिल्डर दोन एचपीच्या मोटारीने पाणी उपसा करत असतानाही ग्रामपंचायतीने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही आणि तुलसी बिल्डिंगला 25 कनेक्शन दिले असून त्याचे पैसे जमा नाहीत. तसेच, घरपट्टीच्या नावाखाली घेतलेले लाखो रुपये नेमके गेले कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, ग्रामपंचायतीकडे वीज बिल भरण्यास पैसे नसल्याने नेरळ शहराचा पाणीपुरवठा पाच दिवस खंडित झाला होता. या परिस्थितीला ग्रामपंचायत प्रशासनच जबाबदार असून, जनतेचा पैसा जनतेच्याच कामासाठी वापरला गेला पाहिजे, अशी आग्रही मागणी चंचे यांनी केली आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या या गैरकारभाराची तात्काळ चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात यावी. जर 6 एप्रिलपर्यंत कारवाई झाली नाही, तर मी आमरण उपोषणाला बसणार असून, माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा भगवान चंचे यांनी दिला आहे.

Exit mobile version