उपसरपंचांसह सात सदस्य राजीनाम्याच्या तयारीत; ग्रामसेवक-सरपंचांच्या कारभारावर सदस्यांचा गंभीर आक्षेप
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरप येथे 2023 पासून विकासकामे व साहित्य खरेदीच्या नावाखाली कथित अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. ग्रामसेवक व सरपंचांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात उपसरपंच शोभा पांडुरंग दोरे यांच्यासह सात सदस्य आक्रमक झाले असून, ठोस कारवाई न झाल्यास राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. याप्रकरणी उपसरपंचांसह सात सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांनी 10 ऑगस्ट 2026 रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती पेण गजानन लेंडी यांच्याकडे तक्रार करून ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली होती.
माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये काही खरेदीच्या पावत्यांमध्ये विसंगती असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. प्रत्यक्ष साहित्य खरेदी, खर्च आणि पावत्यांबाबत प्रश्न उपस्थित करत काही ठिकाणी रकमा फुगवून दाखविल्याचा तसेच परस्पर ठराव करून खर्च केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनंतर विस्तार अधिकारी विक्राती तांडेल यांनी दोन वेळा चौकशी केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. मात्र, चौकशीचा निष्कर्ष अद्याप कळविण्यात आला नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे संपूर्ण आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी उपसरपंच शोभा दोरे, खुमा दोरे व उमा दोरे यांनी केली आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या पाहणीवेळी सरपंच गणेश मनवे व ग्रामसेवक के.पी. पाटील यांची भेट झाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांची आरोपांवरील प्रतिक्रिया मिळू शकली नाही. दरम्यान, प्रशासनाच्या चौकशीनंतर आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे.
