तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील शेतकरी भातशेतीबरोबर दुय्यम पिके घेत असतात. मात्र, तालुका कृषी अधिकारी शेतकरीवर्गाकडे पाठ फिरवत असल्याचा आरोप वरद विनायक शेतकरी सामाजिक संस्था, खालापूर यांच्या वतीने करण्यात आला. तालुक्यातील असलेल्या शेतकरी संस्था शेतकरीवर्गासाठी कृषीविषयक कार्यक्रम घेत असतील, तर कृषी विभाग कार्यक्रम का घेत नाही, असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी शेतकरी समस्यांबाबत केराची टोपली दाखवत असल्यामुळे याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
शेतकरी समस्याबाबत तालुक्यातील कृषी अधिकारी यांना फोन करून किंवा व्हॉट्सॲपला मेसेज करूनसुद्धा कृषी विभागाकडून सातत्याने टाळाटाळ केली जाते. त्याचबरोबर सध्या रब्बी हंगाम सुरू असून, फक्त बियाणे गटांनाच दिले जाणार असल्याचे म्हणणे आहे. यामुळे किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे शासनाच्या योजनेचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांस मिळणार नसल्याचे व्यक्त केले जात आहे.
दरवर्षी आंबा पिकावर फवारणी करण्यासाठी 50 टक्के अनुदानावर औषधे मिळत होती. मात्र, यावर्षी अजूनही औषध आलेले नाहीत. तसेच चालू वर्षी भातपिकासाठी सापळे आले होते, ते तालुका कृषी विभागामध्ये पडून असल्यामुळे शेतकरीवर्गास केव्हा त्यांचा लाभ मिळणार असल्याचे बोलले जाते. पूर्वी असलेल्या कृषी अधिकारी यांनी खालापूर तालुक्यामध्ये कृषी विषयक विविध कार्यक्रम हाती घेतले होते. मात्र, आता ते होत नाही, अशी खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. सदर निवेदन हे विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे, कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे, आमदार कर्जत-खालापूर विधानसभा, तालुका कृषी अधिकारी खालापूर-खोपोली आदींना देण्यात आले आहे.
वरद विनायक शेतकरी सामाजिक संस्थाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. मात्र, आम्ही शेतकरीवर्गास सहकार्य करतो. तसेच फोन रिसिव्ह करून मार्गदर्शन करतो. त्याचबरोबर सर्व योजना ऑनलाईन असून, गटाला बियाणे वाटप केले जाते. त्याचबरोबर आंबा फवारणी अनुदान लवकरच देण्यात येईल, तसेच शेतकरीवर्गासाठी मार्गदर्शन हे रामेतीमध्ये घेण्यात येत असते.
– सुनील निंबाळकर, तालुका कृषी अधिकारी, खालापूर







