राजकीय स्वार्थासाठी अनिष्ट शक्तींसोबत आघाडी

| नागपूर | वृत्तसंस्था |

देशात आपल्या स्वार्थासाठी तसेच राजकीय प्रतिस्पर्धाला पराभूत करण्यासाठी अनिष्ट शक्तींसोबत आघाडी केली जात आहे. असे करणे हा अविवेकी आहे, अशा शब्दांत कोणत्याही राजकीय पक्षांचे नाव न घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी टीका केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील विजयादशमी सोहळ्यात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गायक शंकर महादेवन होते. सुरूवातीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. स्वयंसेवकांचे पथसंचलन झाले. त्यानंतर सरसंघचालकांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी 2024 मध्ये होणारी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक, अयोध्यातील राम मंदिर, मणिपूरमधील हिंसाचार यावर भाष्य केले.

डॉ. भागवत म्हणाले, देशात आपल्या राजकीय स्वार्थासाठी राजकीय प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याच्या हेतूने अशा अनिष्ट शक्तींशी आघाडी करण्याचा अविवेक केला जात आहे. समाज आधीच विविध प्रकारच्या भेदांनी ग्रासलेला आहे. अशा वेळी अशा अनिष्ट शक्तींना समाज किंवा देशाचे विभाजन करून पाहणाऱ्या अंतर्गंत किंवा बाहेरील शक्तींची सहज साथ मिळते. डॉ. भागवत यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उदघाटन होत आहे. तेथे सर्वांना येणे शक्य नाही. म्हणून प्रत्येक भारतीयांनी त्यांच्या गावातच वेगवेगळ्या मंदिरात कार्यक्रम आयोजित करावे. मणिपूर हिंसाचाराबाबत ते म्हणाले, हा हिंसाचार घडत नसून घडवला जात आहे. दशकभर शांत असलेल्या मणिपूरमध्ये अचानक हिंसाचार कसा उफाळून आला? हिंसाचार करणाऱ्यांमध्ये सीमेपलीकडील अतिरेकीही होते का? असा प्रश्नही त्यांनी केला. आगामी 2024 वर्षाच्या सुरुवातीच्या काळात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान लोकांच्या भावना भडकावण्याचे मते मिळवण्याचे प्रयत्न होऊ शकतात असेही डॉ. भागवत म्हणाले.

Exit mobile version