। नाशिक । प्रतिनिधी ।
लोकसभा निवडणुकीत महायुती व मित्र पक्षांकडून मोठ्या निवडणुकीत पैशाचा वाटप सुरू आहे. बारामती, अहमदनगरनंतर आता नाशिकमध्ये महायुती पैशाचे वाटप करत आहे. महायुती राज्यात दोन हजार कोटी रुपये खर्च करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
प्रचार दौर्यानिमित्त नाशिकमध्ये आलेले आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले की, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उन्हाळ्यातही पैशांची धुवांधार बरसात झाली आहे. या संदर्भात एका पोस्टच्या माध्यमातून व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये पैशांच्या बॅगा भरून आणल्याचा आरोप केला होता. त्यावर पवार म्हणाले की, मुख्यमंत्री मुक्कामी राहणार नव्हते. आता फाईल सही करू शकत नाहीत. असे असाताना 9 बॅगा कशासाठी आणल्या, हा प्रश्न उपस्थित होतो. नाशिक आणि दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार सामान्य आहेत. महायुतीचे उमेदवार बलाढ्य आहेत. त्यामुळे नाशिक, दिंडोरीतही पैसेवाटप होईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच, राज्यात महायुतीला 16 ते 18 जागा, महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळणार, यावर रोहित पवार यांनी भाष्य केले. भारतीय जनता पक्षाला 13 ते 14 जागा, शिवसेनेला (शिंदे) 2 ते 3 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) एकही जागा मिळणार नाही. यामुळे महायुतीला राज्यात 16 ते 18 जागा मिळतील, असा दावा पवार यांनी केला.