स्पिकर, मंडप, लायटिंग व्यवसायिकांना परवानगी द्या- आ. जयंत पाटील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोव्हिड 19च्या प्रादुर्भावामुळे भारत देशात 22 मार्च 2020 पासून शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आले ते अद्यापपर्यंत लागू असल्याकारणामुळे अनेक जण बेरोजगार झालेले असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न त्यांच्या पुढे निर्माण झालेला असून त्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. तरी शासनाच्या नियमांनुसार योग्य त्या अटी, वेळ मर्यादा देवून त्यांना देवून परवानगी देण्यात यावी असे पत्र शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धव ठाकरे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. राजेश टोपे, रायगड जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, तहसिलदार यांना पत्र देवून मागणी केलेली आहे.

काही सुशिक्षित बेरोजगारांनी साऊंड सिस्टिम, मंडप, लायटिंग डेकोरेशन हा व्यवसाय सुरू करून ते आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. परंतू कोविड 19 लॉकडाऊनच्या कालावधीला सुमारे 2 वर्ष पूर्ण होतील परंतू या व्यवसायकांना हा व्यवसाय शासनाच्या कोविड 19 च्या नियमामुळे लग्नसराईत, सणासुदीच्या काळात तसेच इतर कार्यक्रमांच्या वेळी स्पिकर लावण्यास, लायटिंग करण्यास मंडपास परवानगी नसल्यामुळे ते बंद असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत लग्न, सार्वजनिक उत्सव झाले त्यावेळी या व्यवसायकांनी काटेकोरपणे शासनाच्या नियमांचे पालन करून व्यवसाय बंद ठेवले आहेत. परंतू या व्यवसायकांचे रोजगार बंद असल्यामुळे कौटुंबिक परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. तसेच त्यांनी या व्यवसायासाठी बेंकेकडून घेतलेल्या कर्जाची फेड करणे त्यांना अशक्य होत आहे. जर त्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिल्यास त्यांचे सर्व प्रश्‍न मार्गी लागणार आहेत. तरी सर्व साऊंड सिस्टिम, मंडप, लायटिंग या व्यवसायकांना त्यांच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार योग्य त्या अटी घालून परवानगी मिळावी अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी केलेली आहे.

Exit mobile version