चढणीचे मासे पकडण्यासाठी लगबग

। पोलादपूर । वार्ताहर ।
पोलादपूर तालुक्यात गेल्या 48 तासांत मुसळधार पाऊस पडून नाल्यांची पात्र दुथडी भरून नदीकडे वाहू लागली. या नदीपात्रालगतच्या चढणीवर नाल्या-शेतात अंडी-पिल्ले सोडण्यास येणार्‍या माशांची वलगन लागली आहे. ग्रामस्थ तसेच आदिवासी बांधवांनी ही वलगनीची गोडया पाण्याची मासळी पकडण्यासाठी नेहमीप्रमाणे सुसज्जता ठेवली असून एकीकडे तालुक्यातील वारकरी माळकरी जनता चातुर्मासाचे नियम पाळत असते; तेवढयाच संख्येने मासेखाऊंची चढणीचे म्हणजेच वलगनीचे मासे पकडून मुसळधार पावसाची साजरी करण्यासाठी लगबग सुरू आहे.

सावित्री, कामथी, घोडवनी, चोळई आणि ढवळी या पाच प्रमुख नद्यांची पात्रं अद्याप पुरेसा पाऊस न पडल्याने उथळच दिसत आहेत. तालुक्यातील प्रदुषणरहित गोडया पाण्यातील वांब, सकला, कटला, मुरगी, अहिर, खडशी, भिंग, मळयाचे मासे, शिंगटया, टोलकी, डाकू मासा, शिवडयाचे पातं असे मासे तसेच किरवी किंवा मुरी, मुठे (पांढरी खेकडी), झिंगे, चिंबोरी (लाल खेकडी)हे अष्टपाद उभयचर मांसाहारी खवैय्यांच्या जीभेवर वेगळीच अवीट चव रेंगाळत ठेवत असल्याने परगावी राहणार्‍या पोलादपूरकरांना त्यांच्या ग्रामीण जीवनाच्या आठवणीच्या काळातील वलगनीचे विशेष अप्रुप वाटत असते.

महाड व पोलादपूर तालुक्यातील मत्स्यप्रेमी खवय्ये आवर्जून कापडे बुद्रुकच्या नरवीर तानाजी मालुसरे कमानीखाली बसलेल्या आदिवासी महिलांकडून अव्वाच्या सव्वा दर मोजून वेगवेगळया प्रकारचे मासे खरेदी करताना दिसत आहेत. पोलादपूरच्या महाबळेश्‍वर रस्त्यालगतच्या मोरीच्या कठडयावर येणार्‍या आदिवासी महिलांच्या टोपलीतील ताजे तडफडीत मासे खवय्यांचे खास आकर्षण ठरत असल्याने दिवसाकाठी दोन-चार खेपा मारणार्‍या मासेखाऊंच्या मासेपुराणाच्या गप्पादेखील मनाजोगते मासे मिळेपर्यंत सुरू असतात. यंदा मांसाहारी विशेषत: मत्स्याहारींमध्ये आषाढ महिन्यातील आखाड सुरू असून मासेखाऊंनादेखील अधिक मासे मिळत असल्याने वलगन करण्याचा उत्साह सगळीकडे दिसून येत आहे.

Exit mobile version