इंधन दरवाढीसह जीवनावश्यक वस्तुही महागल्या

। मुंबई । प्रतिनिधी ।
महागाईने आता कळस गाठला आहे. मध्यमवर्गीय आणि हातावर पोट असणार्‍यांचे जगणे कठीण झाले. दररोजच्या ताटात आवश्यक असलेल्या खाद्यपदार्थांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. चांगल्या प्रतीचा गहू 45 तर कमी दर्जाचा 30 रुपये किलो झाला आहे. खाद्यतेलाचे भाव 160ते 185 च्या दरम्यान आहेत. शासकीय गोदामात दोन वर्षे पुरेल एवढा गव्हाचा साठा असल्याचे दावे सरकार करीत आहे तरीही गहू एवढा महाग विकला जात आहे दोन-तीन महिन्यांपूर्वी 30 रुपये किलो असलेला चांगल्या प्रतीचा गहू 45 च्या आसपास पोहचला आहे. गरीब जो गहू 18 ते 20 रुपये किलोने विकत घेत होता त्याचे दर 26 रुपये झाले आहेत. सोयाबीनचे खाद्यतेल किरकोळमध्ये 160 ते 185 च्या दरम्यान विकले जात आहे. सध्या लाल मिरच्यांचा हंगाम आहे. याच काळात नागरिक वर्षभर पुरेल एवढ्या मिरच्या घेऊन ठेवतात. पण मिरच्यांचे दर 170 ते 260 रुपये किलो झाले आहेत.

भारताकडे गव्हाचा प्रचंड साठा आहे. एक एप्रिल रोजी फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाकडे 7.46 दशलक्ष मेट्रिक टन गव्हाचा साठा आवश्यक असतो. विद्यमान स्थितीत एकूण साठा 23.4 दशलक्ष मेट्रिक टन एवढा आहे. त्यातील काही साठा निर्यात करणे भारताला सहज शक्य आहे. येत्या वर्षातील गव्हाच्या उत्पादनाने या साठ्यात भरच पडणार असल्याने तातडीने निर्यातीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे. परिणामी, भारताच्या गंगाजळीत विदेशी मुद्रा येणार आहे. याशिवाय हरभरा डाळीच्या दरातही मागणी वाढल्याने प्रति किलो 150 रुपयांची वाढ झाली आहे. तूर डाळ, तांदूळ आणि तेलाचे दर स्थिरावलेले आहेत. हरभर्‍याची सरकार हमी भावाने खरेदी करीत असल्याने भाव वाढ झालेली आहे.

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढ सुरुच असून गेल्या सात दिवसांत सहाव्यांदा सोमवारी तेल कंपन्यांनी इंधन दरवाढ केली. पेट्रोल दरात 30 पैशांची तर डिझेल दरात 35 पैशांची वाढ करण्यात आली आहे. मागील आठवडाभरात पेट्रोल दरात एकूण 4 रुपयांची तर डिझेल दरात 4.10 रुपयांची वाढ झालेली आहे. राज्यात दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे प्रति लीटरचे दर 99.41 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे डिझेलचे दर 90.42 रुपयांवर गेले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल 114.19 तर डिझेल 98.50 रुपयांवर गेले आहे. तामिळनाडूतील येथे हेच दर क्रमशः 105.18 आणि 95.33 रुपयांवर तर प. बंगालमधील कोलकाता हे दर क्रमशः 108.85 आणि 93.92 रुपयांवर गेले आहेत.

Exit mobile version