तळा बाजारपेठेत हापूसचा दुष्काळ

तळा | वार्ताहर |
मे महिना संपत आला असतानाही बाजारात हापूस आंबे विक्रीसाठी उपलब्ध झाले नसल्याने तळा बाजारपेठेत हापूस आंब्यांचा दुष्काळ पडला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आंब्यांच्या बागा असल्याने येथील शेतकरी आंब्यांची विक्री करून दरवर्षी चांगला फायदा कमावतात. यावर्षी कडाक्याची थंडी पडल्यामुळे सर्वत्र आंब्याचा मोहोर बहरला होता. त्यामुळे यावर्षी भरभरून आंबे मिळतील अशी आशा शेतकरी वर्गाला होती. मात्र, अवकाळी पाऊस व लहरी हवामानाचा फटका आंबा पिकाला बसून बहुतांश मोहोर गळून पडला. त्यामुळे यावर्षी आंब्याचे पीक फार कमी झाले असल्याने अद्यापही बाजारपेठेत हापूस आंबा विक्रीसाठी उपलब्ध झालेला नाही. दरवर्षी मे महिन्यात लग्नसराई तसेच सुट्टीसाठी आलेले मुंबईकर चाकरमानी आवर्जून परतताना गावाकडून आंबे घेऊन जातात. मात्र, अद्यापही तळा बाजारपेठेत आंबे विक्रीसाठी उपलब्ध झाले नसल्याने शहरातील चाकरमान्यांचा हिरमोड झाला असून, त्यांना शहराकडे रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

Exit mobile version