सापडलेले सोन्याचे जोड केले परत
| नागोठणे | वार्ताहर |
आज माणुसकी लोप पावत असल्याची ओरड सर्वत्र ऐकायला मिळत आहे. असे असतांनाच काही व्यक्ती आपल्या कृतीमधूनच माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून देत आहेत. असाच काहिसा प्रकार नागोठण्यात घडला असून आपल्या प्रामाणिकपणातून हा माणुसकीचा ओलावा जिवंत असल्याचे नागोठणे बाजारपेठेतील एक छोटे व्यपारी अमर अशोक भंडारे यांनी त्यांना सापडलेले सोन्याचे जोड परत करुन दाखवून दिले आहे.
नागोठणे पोलिस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार नागोठणे बाजारपेठेत कटलरी सामानाचे दुकान असलेले छोटे व्यापारी अमर अशोक भंडारे रा. गवळ आळी नागोठणे हे बाजारपेठेतील किराणा दुकानदार व्यापारी संतोष कावेडिया जैन यांचे दुकानाबाहेर कटलरीचे दुकान चालवतात. त्यांना शनिवारी (दि. 23) सकाळी त्यांचे दुकानांमध्ये खरेदी करीता आलेल्या एका मुलीचे सोन्याचे कानातील जोड मिळून आले. सोन्याचे कानातील जोड अमर भंडारे यांनी प्रामाणिकपणे नागोठणे पोलिस ठाण्यात आणून दिले होते. नंतर सोन्याचे कानातील जोड हरविलेली मुलगी मनिषा गुप्ता हिचा भाऊ आकाश गुप्ता हा पोलीस ठाण्यात सोन्याचे जोड हरविल्याची माहिती देण्यास पोलीस ठाण्यात आला. त्यावेळी सोन्याच्या जोडांची ओळख पटविण्यात आली. भंडारे यांना (दि. 26) मार्च रोजी नागोठणे पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले व सदर कानातील जोड हे अमर भंडारे यांचे हस्ते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि. हरेश काळसेकर यांच्या उपस्थितीत आकाश गुप्ता यांना परत देण्यात आले आहेत.