अमर क्रीडा, शिवनेरी सेवा, अंकुर स्पोर्टस्

लायन्स स्पोर्टस् उपांत्यपूर्व फेरी दाखल


| मुंबई | प्रतिनिधी |

अमर क्रीडा, शिवनेरी सेवा, अंकुर स्पोर्टस्, लायन्स स्पोर्टस् यांनी विजय नवनाथ मंडळाने अमृत महोत्सवी वर्षानिमित आयोजित केलेल्या पुरुष प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. सर्वच सामने चुरशीने खेळले गेले. सेनापती बापट मार्ग, लोअर परेल येथील फिनिक्स टॉवर शेजारील मैदानात सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात काळाचौकीच्या अमर मंडळने ओम् पिंपळेश्‍वर मंडळाला 36-34 असे चकविले.

दादरच्या शिवनेरी मंडळाने ना. म. जोशी मार्गच्या बलाढ्य जय भारत क्रीडा मंडळाचा प्रतिकार 34-22 असा संपविला. सातरस्त्याच्या अंकुर स्पोर्टस्ने प्रभादेवीच्या सिद्धीप्रभा फाऊंडेशनचा विरोध 33-24 असा मोडून काढला. शेवटच्या सामन्यात ना. म. जोशी मार्गच्या लायन्स स्पोर्टस् ने त्यांच्याच शेजारच्या गुड मॉर्निंग स्पोर्टस् चा 35-33 असा पाडाव केला. संयमी खेळ करीत पहिल्या सत्रात 17-16 अशी आघाडी घेणार्‍या लायन्सने दुसर्‍या सत्रात देखील तोच पवित्रा वापरत 2 गुणाने आपला विजय साकारला. राज आचार्य, प्रणय आळवणे, यश साळगावकर लायन्स कडून, तर साहिल राणे, विजय देसाई गुड मॉर्निंग कडून उत्कृष्ट खेळले.

Exit mobile version