Raigad River Flood News: अंबा, कुंडलिका, पाताळगंगा नद्यांना पूर

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शनिवारपासून कोसळणाऱ्या पावसाचा रविवारीसुद्धा जोर कायम राहिल्याने रायगड जिल्ह्यात अक्षरश: जलप्रकोपाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, अनेक गावांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, अनेक ठिकाणी घरे, गोठे आणि शेतीचे नुकसान झाले आहे. दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे शंभरहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, महावितरणच्या यंत्रणेलाही मोठा फटका बसल्याने हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

जिल्ह्यात सरासरी 211.90 मिमी पावसाची नोंद झाली असून, पनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यांत सर्वाधिक 300 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. जिल्ह्यातील 28 लघु प्रकल्पांपैकी 12 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी, भिसेखिंड आणि नागोठणे परिसरात पाणी साचल्याने वाहतूक बंद करावी लागली. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, कर्जत, पेण आणि पनवेल तालुक्यांतील अनेक गावांचा संपर्क तुटला असून, सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.

वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे, गोठ्यांचे आणि वीज खांबांचे नुकसान झाले. रोहा तालुक्यातील नागोठणे उपकेंद्र परिसरात पाणी शिरल्याने सुमारे सात हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. विविध ठिकाणी झाडे कोसळणे, रस्ते बंद होणे आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
दरम्यान, पनवेलमधील पांडवकडा धबधब्यावर दोन पर्यटक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली असून, त्यांचा शोध सुरू आहे. हवामान विभागाने पुढील काही तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तीन प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका आणि अंबा, तसेच खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहात आहे. त्यामुळे नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, महाडची सावित्री, कर्जतची उल्हास आणि पनवेलची गाढी या नद्यांतील पाणीपातळी अद्याप इशारा पातळीच्या खाली असली, तरी सततच्या पावसामुळे त्यात झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Exit mobile version