शिवसेना ठाकरे गटाचा रास्ता रोकोचा इशारा
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पाली अंबा नदीवरील पुलाचे काम गेली तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, ते काम आजतगायात पूर्ण झाले नाही. अशा या रखडलेल्या पुलामुळे प्रवास करणे धोकादायक बनले आहे. पाली अंबा नदी धोकादायक पूलप्रश्नी ठाकरे शिवसेना आक्रमक झाली असून, यासंदर्भात सुधागड पाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पाली तहसिलदार उत्तम कुंभार आणि पाली पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांना निवेदन दिले.
दरम्यान, पुलाचे काम जलद उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपजिल्हा संघटक राजेंद्र राऊत, सुधागड तालुका प्रमुख दिनेश चिले, युवासेना जिल्हाधिकारी सचिन डोबले, पाली शहर प्रमुख ओमकार खोडागळे, विभाग प्रमुख किशोर दिघे, शिवसैनिक विद्देश आचार्य, पाली उपशहर प्रमुख सूरज गुप्ता, रोहन राऊत आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
वाकण पाली महामार्गावरील पाली अंबा नदीवरील नव्या पुलाचे काम एमएसआरडीसी मार्फ़त मागील तीन वर्षापासून करत आहे. मात्र अद्यापही केवल एकच बाजूच्या पुलाचे बांधकाम सुरू असून तेही आजतागायात पूर्णत्वास आले नाही परिणामी त्या नवीन पुलाच्या सळ्या या धोकादायक परिस्थितीत जुन्या पूलाच्या बाजूकडे निघाल्या आहेत. तसेच सदरील वाहतूक ही जुन्या पुलावरून सुरू असून निघालेल्या सळ्या, तुटलेले कठडे, आणि पुलाला पडलेले खड्डे त्यामुळे अंबा नदीवरील जुना पुलावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.
याबाबत वेळोवेळी एमएसआरडीसी अधिकार्यांशी संपर्क साधला तरी पण या गोष्टीकडे एमएसआरटीसी अधिकारी लक्ष देत नाहीत, तसेच किमान नवीन होत असलेल्या पुलावरून वाहतूक सुरू झाल्यास जुन्या पुलाचा धोका कमी होईल अन्यथा जुन्या पुलावरून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच नवीन पुलाच्या निघालेल्या सळयाने अपघात होऊ शकतो, तरी याबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी अन्यथा या गंभीर विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्हाला दि.25 रोजी रास्ता रोको आंदोलन करावे लागेल, असा इशारा शासनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निवेदनाद्वारे केला आहे.