जिल्ह्यात झोडपधारा सुरुच

अंबा नदीने धोका पातळी ओलांडली,; कुंडलिका, पाताळगंगा इशारा पातळी पुढे

| खास प्रतिनिधी | रायगड |

हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच जुलैअखेरपर्यंत अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या 24 तासांमध्ये अंबा नदीने धोका पातळी ओलांडली असून, कुंडलिका, पाताळगंगा या नद्या इशारा पातळीच्या पुढे वाहत आहेत. मुरुड, पेण, तळा आणि पोलादपूर पूरगस्त आणि दरडग्रस्त गावातील 66 कुटुंबांतील 205 नागरिकांचे सहा कॅम्पमध्ये स्थलांतरीत केले आहे. तसेच 36 कुटुंबांतील 131 नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतरीत करण्यात आले आहे.

मुसळधार पडत असलेल्या पावसाने अंशतः 39 कच्च्या घरांचे तर, पाच पक्क्या घरांचे नुकसान झाले आहे. मुरुड तालुक्यातील 32 घरांचे छप्पर उडाले आहे. मुंबई-पुणे महामार्गावर कलोते गावाजवळ पावसाचे पाणी साचल्याने एक एसटी बस अडकली होती. सर्व प्रवासी सुखरुप आहेत. आपटा-खारपाडा पनवेल मार्गावर पाणी आल्याने वाहतूक प्रभावित झाली. पेण तालुक्यातील खालचा पाडा डोलवी येथील भरत नारायण म्हात्रे यांच्या घराच्या चारही बाजूने पाणी साचले आहे. घरातील 57 वर्षीय भरत म्हात्रे आणि विशाखा म्हात्रे वय 54 वर्ष यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. सध्या ते त्यांचे नातेवाईक प्रशांत माळी यांच्याकडे राहणार आहेत. पोलादपूर तालुक्यातील चिरेखिंड ते आंबेमाची रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद होती. दरड हटवण्याचे काम सुरु होते. तसेच कर्जतमधील नेरळ-कळंब रस्त्यावरील दहीवली पुलावरुन पाणी जात असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

अंबा नदीची इशारा पातळी 8 मीटर आहे. तर धोका पातळी 9 मीटर आहे. ती 8.20 मीटरवरून वाहत आहे. कुंडलिका नदीची इशारा पातळी 23 मीटर आहे. तर धोका पातळी 23.95 मीटर आहे. ती 23.85 मीटरवरून वाहत आहेत. पाताळगंगा नदीची इशारा पातळी 20.50 मीटर आहे. तर धोका पातळी 21.52 मीटर आहे. ती सध्या 20.50 मीटरवरून वाहत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने तीनही नद्या कुठल्याही क्षणी धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदी किनार्‍यांवरील गावांना आणि शहरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाडच्या सावित्री नदीच्या पातळीत वाढ झाली असली तरी तिने अद्याप इशारा पातळी ओलांडलेली नाही.

जिल्ह्यातील दरडप्रवण आणि पूरप्रवण गावांवर जिल्हा प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. तसेच सर्व यंत्रणेला सुसज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी जावळे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची काल रात्री दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन प्रशासनाच्या तयारीचा, उपाययोजनांचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, जिल्हा प्रशासन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदत शिबिरे म्हणून वापरता येतील अशा इमारती प्रशासनाने ओळखल्या आहेत. तहसीलदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध असतील याची खात्री करण्यास सांगितले आहे. आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्याची कार्यवाही तात्काळ करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचेही सांगितले. पुढील काही दिवस रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण जिल्हा प्रशासनाने गाफील न राहता पुढील काही दिवस कमालीची सतर्कता बाळगावी, तसेच कुठल्याही परिस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालय सोडू नये. आपल्या क्षेत्रातील सर्व धोकादायक स्थळंचा अभ्यास करून आपत्ती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजनासाठी कृती आराखडा तयार ठेवावा.

Exit mobile version