अंबादास दानवे यांना निलंबनातून सूट

। मुंबई । प्रतिनिधी ।

शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विधान परिषदेतून निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्र लिहून निलंबनाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी सभापतींकडे केली होती. सभापतींनी अंबादास दानवेंच्या निलंबनावर सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना निलंबनातून सूट देण्यात आली आहे. पाच दिवसांऐवजी केवळ तीन दिवसांच्या निलंबनाची कारवाई दानवेंवर करण्यात आली आहे. त्यामुळे आता दानवे शुक्रवारपासून विधीमंडळाच्या कामकाजात सहभाग घेतील. अंबादास दानवे यांनी सभागृहात भाजप नेते प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. दानवेंनी असभ्य भाषेचा वापर केला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रसाद लाड यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी केली होती. त्यानंतर त्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्याचा निर्णय उपसभापतींनी घेतला होता. दरम्यान, अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेण्यात यावे,यासाठी सलग दोन वेळा उपसभापती यांच्या दालनात बैठका पार पडल्या. एवढंच नाही तर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीला उपस्थिती लावली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा केली. अंबादास दानवेयांनी माफीचे पत्र देखील लिहिलं होते. या प्रकरणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील माफी मागितली होती. यातच कारवाई करताना दानवे यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचा आरोप आमदार अनिल परब यांनी केला होता.

Exit mobile version