| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये मंगळवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यानंतर चिरेखिंड धनगरवाडीतील डोंगरामधून ओढ्यासारखा पावसाच्या पाण्याचा प्रवाह सुरू झाला आणि लाल मातीचे ढिगारे तसेच मोठमोठया आकाराचे दगड घाटरस्त्यामध्ये आले. यावेळी आपत्ती निवारण आणि व्यवस्थापन प्रमुख तसेच पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी घाटरस्त्याची वाहतूक तात्पुरती बंद ठेवली. दरम्यान, प्रतापगड रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी आंबेनळी घाटरस्त्यामध्ये आलेले मोठे दगड बाजूला करून ओढासदृश्य पाण्याचा लोट दरीकडे जाण्यासाठी वाट निर्माण करून दिली.
पोलादपूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या भागातील पर्जन्यमान वेगवेगळे असल्याने काही ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्याचे दिसून आले. मंगळवारी रात्री साडेआठ नऊ वाजण्याच्या सुमारास चिरेखिंड धनगरवाडीतील जॅकवेल तसेच लगतच्या ओढयातून मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचा प्रवाह आंबेनळी घाटरस्त्यावर आल्याने या प्रवाहासोबत मोठ मोठे दगड तसेच लालमातीचे ढिगारेदेखील रस्त्यावर आले. रस्त्यावरून पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने घाटातून जाणार्या वाहनांना अतिशय जिकिरीने मार्ग काढावा लागत असल्याचे पाहून प्रतापगड रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी आंबेनळी घाटरस्त्यामध्ये आलेले मोठे दगड बाजूला करून ओढासदृश्य पाण्याचा लोट दरीकडे जाण्यासाठी वाट निर्माण करून दिली. मात्र, यामुळे आंबेनळी घाटातील रस्ता रात्रीच्यावेळी वाहतुकीसाठी धोकादायक स्थितीत असल्याचे लक्षात घेऊन कपिल घोरपडे यांनी घाटरस्त्याची वाहतूक तात्पुरती बंद ठेवली.
सकाळी सूर्योदयासोबतच आंबेनळी घाटातून जाणार्या पोलादपूर महाबळेश्वर वाई सुरू रस्त्याची स्थिती लक्षात घेऊन वाहतुकीसाठी रस्ता पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलादपूरचे मंडल अधिकारी राठोड तसेच अव्वल कारकून मंगेश ढेबे तसेच तलाठी यांनी चिरेखिंड धनगरवाडीतील ओढा व जॅकवेल परिसरातील दगड आणि लालमातीचे ढिगारे यांची पाहणी करून ग्रामस्थांना अतिवृष्टी काळात धोका संभवणार नसल्याची खात्री करून पोलादपूर तहसील कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षाकडे अहवाल सादर केला.