| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील आंबिवली गावातील रस्त्याचे काम रखडले असून, या रस्त्यावरील प्रलंबित कामे मार्गी लावा, अशी मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते महेश भगत यांनी केली आहे.
माणगाव तर्फे वरेडी हद्दीतील आंबिवली गावातील रस्त्याचे काम अर्धवट स्वरूपाचे आहे. कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यात येत असलेल्या आंबिवली गावातील कर्जत-कल्याण राज्यमार्गापासून ते आंबिवली रेल्वे गेट असा रस्ता काँक्रिट च बनविला गेला आहे. रेल्वे फाटकापासून आंबिवली गावाकडे येणार्या रस्त्याच्या कामाची सुरुवात 15 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आली होती. परंतु, रस्त्याचे काम अर्धवट स्वरूपाचे आहे. रस्त्यावरती डांबरीचे कार्पेट आणि मोर्यांचे काम अजूनदेखील बाकी आहे. येत्या पावसाळ्यात रस्त्याची अवस्था दयनीय होणार आहे.
शासनाने केलेला खर्च हा सर्व पाण्यात जाईल, तसेच ज्या ठिकाणी मोर्यांचे काम बाकी आहे, तिथे रस्ता खचण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही सर्व कामे लवकरात लवकर व्हावीत, अशी मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते महेश भगत यांनी लावून धरली आहे. त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी स्वरूपात पत्रव्यवहारदेखील केला आहे आणि प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.







