रुग्णवाहिकेचा चालकांची उपासमार

तीन महिने पगारापासूचन वंचित
आरोग्य खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड ग्रामीण रुग्णालयातील 102 नंबर अ‍ॅम्ब्युलन्सवर काम करणार्‍या चालकांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन रखडले असून, आरोग्य खात्याचे दुर्लक्ष झाल्याने या चालकांवर उपासमारीची पाळी आली आहे. वेळोवेळी या चालकांनी वरिष्ठांना कळवूनसुद्धा वेतन मिळत नसल्याने हे सर्व चालक हवालदिल झाले आहेत.
अ‍ॅम्ब्युलन्सवर चालक असणार्‍या पनवेल, अलिबाग, रोहा, उरण, कर्जत चौक, महाड, रोहा आदी तालुक्यांतील चालकांना मागील तीन महिन्यांचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावयाचा हा प्रश्‍न येथे निर्माण झाला आहे.
ग्रामीण रुग्णालयातील 102 अ‍ॅम्ब्युलन्सचा उपयोग आरटीपीसीआर सॅम्पल जिल्हा रुग्णालयात घेऊन जाणे, व्हॅक्सिन आणणे, औषधे आणणे, ऑक्सिजन आणणे, व्हॅक्सिनेशन सेंटरवर व्हॅक्सिनची ने-आण करणे, अतितातडीच्या रुग्णास तातडीने जिल्हा रुग्णालय व अन्य हॉस्पिटलमध्ये पोहोचवणे, गरोदर मातांना घरातून रुग्णालयात आणणे, तसेच त्यांना प्रसूतीनंतर त्यांच्या घरी सुखरूप सोडणे आदी स्वरुपाची कामे येथील चालक 24 तास गरज लागेल तेव्हा करीत असतात.
अ‍ॅशकॉम मीडिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड भोपाळ या कंपनीकडून येथील चालकांना पगार दिला जातोय. परंतु, वारंवार तीन-चार महिन्यांच्या विलंबानंतर सातत्याने फोन केल्यावर एक किंवा दोन महिन्यांचा पगार दिला जातो. तोही कधी पूर्ण, तर कधी अर्धा पगार या चालकांना मिळत असतो.
या चालकांना मासिक वेतन 8983 रुपये दिले जाते. परंतु, हा पगारसुद्धा कित्येक महिन्यांच्या अंतराने दिला जात आहे. केंद्र शासनाने किमान वेतन हे 18 हजार रुपये केले असतानासुद्धा संबंधित ठेकेदार मात्र या चालकांना कमी पगार देऊन त्यांची पिळवणूक करीत असतानासुद्धा वरिष्ठ अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत.

आरोग्यमंत्र्यांनी लक्ष घालावे
या चालकांना किमान वेतनप्रमाणे पगार मिळणे खूप आवश्यक आहे. परंतु, कोणताही अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने ठेकेदार चांगलाच नफा कमवत असल्याची भावना चालकांमध्ये आहे. आरोग्यमंत्र्यांनी या बाबीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे व चालकांना नियमित व केंद्र शासनाप्रमाणे समान काम समान वेतन मिळावे, अशी चालकांकडून मागणी होत आहे.

Exit mobile version