। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील वावंजे प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रजासत्ताक दिनी रुग्णवाहिकेची भेट देण्यात आली आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतील लींडे कंपनीच्या सीएसआर फंडातून ही रुग्णवाहिका देण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील आणि रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी काशिनाथ पाटील म्हणाले की, तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास दोन लाख कामगारांना रोजगार मिळत असतो. या ठिकाणी असणार्या कित्येक कंपन्यांच्यात आम्हा पुढार्यांना जाण्याची कधी संधी देखील मिळत नाही. लींडे या कंपनी व्यवस्थापना सोबत माझा यापूर्वी कुठलाही परिचय नव्हता. परंतु कोरोनाविषाणूच्या दुसर्या लाटेमध्ये जेव्हा वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला तेव्हा ही कंपनी तो ऑक्सिजन बनवत असल्याचे समजले. आज या ठिकाणी कंपनी व्यवस्थापनाचे आणि त्यांच्या तमाम कर्मचार्यांचे मी आभार मानतो कारण त्यांनी प्रचंड कष्ट घेऊन वैद्यकीय ऑक्सिजन निर्माण केला व तो महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील हॉस्पिटल्सना देखील पुरवला. वावंजे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका ही जुनी झाली होती त्यामुळे तिच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च करणे देखील अवघड होऊन बसले होते. या कंपनीने योग्य वेळी योग्य भेट प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली आहे. परिसरातील नागरिकांसाठी ही रुग्णवाहिका लाभदायी ठरेल.
रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, लिंडा कंपनीचे विभागीय प्रमुख रंगनाथन, विभागीय व्यवस्थापक एन.के.पवार, अमरिंदर सिंग, वावंजे ग्रामपंचायतीचे सरपंच डी.बी.म्हात्रे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राज चव्हाण, आरोग्य सहाय्यक तानाजी जाधव, योगिता गुरव, कनिष्ठ सहाय्यक दत्तात्रेय चोरघे, ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.