। सातारा । प्रतिनिधी ।
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. रुग्णवाहिकेची गॅस टँकरला जोरदार धडक झाली. यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रायगाव फाटा येथे हा भीषण अपघात झाला. साताऱ्यातील संगम माहुली येथील संतोष पवार (28) हे गुरुवारी (दि. 05) दुपारी रुग्णाला सोडण्यासाठी पुणे येथे गेले होते. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून साताऱ्याकडे येताना रायगाव फाटा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस टँकरला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत पवार हे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी सातारा येथील श्वास मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
संतोष पवार हे श्वास मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिकाचालक म्हणून काम पाहत होते. तर, त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने ते गेली 10 वर्ष छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे सदस्य होते.