स्पष्टता द्यावी अन्यथा जनआंदोलन
| कर्जत | प्रतिनिधी |
गेले दोन महिने चाललेला कर्जत नगरपरीषदेचा करवाढीचा गोंधळ अजूनही न संपल्याने व नगरपरीषद प्रशासनाने कर्जतकरांना या करवाढी संदर्भात अजूनही कोणतीही स्पष्टता किंवा लेखी आश्वासन न दिल्याने, आम्ही कर्जतकर या नागरीकांच्या संघटनेने प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी पासून जनआंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नगरपरिषदेने चुकीच्या पद्धतीने करवाढ केल्याने कर्जतकर नागरिकांना एकत्रित करून श्री शनी मंदिरामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश लाड, रजनी गायकवाड, अॅड. कैलास मोरे, रमाकांत जाधव, प्रशांत उगले, सुनील जाधव आदी उपस्थित होते. याप्रसंगी पालिकेने केलेली अन्यायकारक करवाढ, करमूल्यांकना करीता नेमलेली एजन्सी, नागरीकांनी करवाढी विरोधात घेतलेली हरकत, नगरपरिषदेने घेतलेला ठराव व त्यानंतर नगरपरीषदेने अलिबागला वरीष्ठ कार्यालयांकडे घेतलेली धाव याबाबत अॅड. मोरे यांनी सविस्तर माहिती दिली.
नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव करून अलिबागला वरीष्ठ कार्यालयांकडे कागदपत्रे सादर करून प्रशासन हातावर हात ठेवून गप्प बसले आहे. त्यांना मुदतवाढ हवी आहे. हे सारे खरे असले तरी त्याबद्दलची माहिती नागरिकांना देणे गरजेचे आहे. कायदेशीर करवाढीला विरोध असण्याचा प्रश्नच नाही. मात्र जे नको ते कर लावले आहेत. ते नियमात बसतात काय हे पाहणे आवश्यक आहे. स्वतःचे घर असेल त्याला ठराविक कर आणि ब्लॉक मध्ये राहत असेल त्याला तो कर नाही. हा काय प्रकार आहे ते समजले पाहिजे.
अॅड. कैलास मोरे
नागरिकांच्या सूचना
बैठकीत अनेकांनी व्यथा व सूचना मांडल्या. त्यामध्ये सहा महिन्यात त्या एजन्सीने व्यवस्थित सर्व्हे केला नाही. तो दीड – दोन महिन्यात कसा होईल? आणि सर्व्हे झाल्यास त्याचे पैसे कोण देणार? की त्याचा भुर्दंड पुन्हा नागरिकांच्या माथी मारणार? याचे उत्तर सुद्धा नगरपरिषद प्रशासनाने द्यावे. असे सूचित करण्यात आले. तसेच या बैठकीला एकही नगरसेवकाने उपस्थिती दर्शविली नाही. त्याबद्दल उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सर्वात महत्वाचे म्हणजे डॉ. गीता काळे यांच्या घरासमोरील इमारत पडली आहे. तेथे कचारा कुंडी नव्हे तर डम्पिंग ग्राउंड झाले आहे. त्याबद्दल आरोग्य सभापती तथा उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांना सांगीतले असता त्यांनी तो कचरा आम्ही साफ करणार नाही, असे बेजबाबदार उत्तर दिले. त्याचे कारण ती जागा विकसित करणारे धनिक व सत्ताधारी आहेत. त्यामुळे त्या कचर्याबाबत कुणी बोलत नाही किंवा निर्णय घेत नाही, असे डॉ. काळे यांनी स्पष्ट केले व नगरपरिषदेत याबाबत विचारणा केली असता कोण कचरा टाकतात? त्याकडे लक्ष ठेवा असे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर 20 जानेवारी पर्यंत नगरपरिषद प्रशासनाने करवाढी बद्दल स्पष्टता दिली नाहीतर 26 जानेवारी पासून जनआंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला डॉ. गोपीनाथ जंगम, विनोद पांडे, कृष्णा जाधव, प्रदिप गोगटे, राकेश देशमुख, संदिप पावसकर, कृणाल बर्वे, अंबादास तारू, अनंता शेळके, सुनिल पवार, रमाकांत कदम, दिपकार सालये, मोरेश्वर कर्वे, राजेश भुतकर, सुनिल दानवे, गणेश घोडके, चेतन शहा, दिनेश कडू, अनिस मणीयार, किशोर तावरे, सिताराम पाटील, सदानंद धामणकर, भाऊसाहेब मोरे, भिमराव गाडे, विशाल निमकर्डे, भावेश ठक्कर, गोपीलाल ओसवाल, भारती कांबळे आदी कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.