अमोल कोल्हे महाराष्ट्राचा स्वाभिमान ; सुप्रिया सुळे

। पेठ । वृत्तसंस्था ।

शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना बाके वाजविणारा खासदार पाहिजे की कांदा बाजारभावावर बोलणारा खासदार पाहिजे? मेरिट बघून पुन्हा एकदा या भागाचा प्रतिनिधी म्हणून अभ्यास आणि कर्तृत्ववान डॉ. अमोल कोल्हे यांना आशीर्वाद द्या. महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांना लोकसभेत पाठवा. आमच्याकडे पैशाची अतिवृष्टी झाली. तुमच्याकडेही होईल. त्यांना पकडा व पोलिसांकडे द्या. सगळ्या बँकांवर लक्ष ठेवा. धमक्यांना घाबरू नका,असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

पेठ (ता. आंबेगाव) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, बाळासाहेब बाणखेले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर, तालुका प्रमुख दत्ता गांजाळे, काँग्रेसचे राजू इनामदार, विक्रम भोर, पूजा वळसे पाटील, सुरेखा निघोट, अल्लू इनामदार, भारती शेवाळे आदी उपस्थित होते.

लोकसभेत कांद्याच्या भावाबाबत मी आणि अमोल कोल्हे यांनी प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर आम्हाला निलंबित केले जाते. कांद्याला हमीभाव मागणे, हा गुन्हा आहे का? केंद्रातील सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी आहे. या देशातील एकही कामगार परमनंट (कायम) होणार नाही, हे केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे मी आणि अमोल कोल्हे यांनी हाणून पाडले आहेत. वीज, पाणी, शाळा, अंगणवाडी, बँक, एमआयडीसी, रस्ते, कारखाने काँग्रेसच्या काळात झाले. मग तुमच्या पदरात या सरकारने काय टाकले? महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार याबाबत केंद्रातील सरकार बोलत नाही, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

Exit mobile version