। नेरळ । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा तसेच कर्जत तालुका विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक मिळविणार्या नेरळ येथील एलएईएस शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्य विज्ञान प्रदर्शनातदेखील आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. अमरावती येथे झालेल्या राज्य विज्ञान प्रदर्शनात नेरळ येथील शाळेच्या प्रकल्पाला चौथा क्रमांक मिळाला आहे. दरम्यान, हा एलएईएस शाळेच्या क्रिशा सावंत आणि वल्लरी प्रकल्प बेंद्रे यांनी मांडलेला किराणा साहित्य दुकान आणि गॅस सिलिंडर यांच्याबाबत अलर्ट करणारा प्रकल्प पश्चिम भारत विज्ञान जत्रा 2025 साठी पात्र ठरला आहे.
अमरावती येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. या 52व्या विज्ञान प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातील 111 बळ वैज्ञानिकांचे प्रकल्प मांडण्यात आले होते. कर्जत तालुका विज्ञान प्रदर्शन आणि रायगड जिल्हा विज्ञान प्रदर्शनात प्रथम आलेल्या नेरळ येथील एल.ए.ई.एस. इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थिनी क्रिशा सावंत आणि वल्लरी बेंद्रे यांनी स्मार्ट सिलिंडर ट्रॉली आणि किराणा सामानाचे व्यवस्थापन तंत्र हा प्रकल्प प्रदर्शनात मांडला होता. आठवीमध्ये शिकत असलेली क्रिशा आणि सातवीमध्ये शिकत असलेली वल्लरी या दोघींनी ‘लाडकी’ या नावाने प्रकल्प सादर केला आहे. यामध्ये त्यांनी तीन प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या.
काय आहे तंत्र?
नेरळ येथील एलएईएस शाळेच्या विद्यार्थ्यांनी किराणा सामान व्यवस्थापनाचे नवे तंत्र शोधून काढले आहे. स्मार्ट ग्रॉसरी रँक या प्रकल्पाच्या मदतीने घरातील धान्य आणि किराणा सामानाचे व्यवस्थापन मोबाइल अॅपद्वारे करता येणार आहे. घरातील धान्य किती उरले आहे, कोणते संपत आले आहे, याची माहिती थेट अॅपद्वारे मिळणार असल्याने गृहिणींना किराणा खरेदी करताना सोयीस्कर ठरणार आहे. तसेच, दुध उतू जात असल्यास गॅस आपोआप सेंसरच्या मदतीने बंद होणार आहे. तर, तिसरा प्रकल्प सिलिंडर किती संपला आहे याचे मेसेज देणारा आहे.
आम्ही तालुक्यात विज्ञान प्रदर्शनात 165 प्रकल्प मांडले होते. त्यातून जिल्ह्यातून राज्यासाठी निवडण्यात आलेले सर्व पाच प्रकल्प कर्जत तालुक्यातील होते. त्यामुळे राज्यातदेखील कर्जत तालुका दिसून आला आहे, याचा आनंद आहे.
संतोष दिंड,
शिक्षण अधिकारी
