अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिंडीचा वरसोलीत प्रारंभ

अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त रायगड जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात स्वातंत्र्याची दिंडी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ सोमवारी (दि.8) वरसोली येथे रॅली काढून करण्यात आला. यामध्ये वरसोली जिल्हा परिषद शाळा, इंडियन एज्युकेशन सोसायटी शाळा वरसोली विद्यार्थ्यांसह, गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखिण्यात आला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याची दिंडी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वरसोली येथील रॅलीला भारत सरकार केंद्रीय संचार ब्युरो अहमदनगर, नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी, वरसोली ग्रामपंचायत, वरसोली जिल्हा परिषद शाळा, इंडियन एज्युकेशन सोसायटी शाळा वरसोली यांचे सहकार्य लाभले. रॅलीला वरसोली ग्रामपंचायत येथून सुरुवात होऊन विठ्ठल रखुमाई मंदिरात सांगता करण्यात आली. रॅलीत भारतमातेची दिंडी काढण्यासोबत विद्यार्थ्यांनी भारतमाता तसेच शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती. देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. पथनाट्याच्या माध्यमातून हर घर तिरंगा अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच यावेळी पर्यावरण संवर्धनाबाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली.

या रॅलीत जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, माध्यमिक विभाग शिक्षण अधिकारी जोत्स्ना शिंदे-पवार, केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकार अहमदनगर प्रतिनिधी फनीकुमार पी., जिल्हा क्रीडा अधिकारी सचिन निकम, नेहरू युवा केंद्र जिल्हा समन्वयक निशांत रौतेला, अलिबाग पंचायत समिती गटविस्तार अधिकारी ज्ञानेश्‍वर साळावकर, वरसोली सरपंच प्रमिला भाटकर, निवृत्त कॅप्टन उमेश वाणी, स्वातंत्र्यसैनिक अमरनाथ राणे, स्वातंत्र्यसैनिक दामोदर पडवळ, जयवंत गायकवाड, मिलिंद कवळे, तपस्वी गोंधळी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले होते.

स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून नागरिकांमध्ये देशभावना जागृत करण्याचा प्रयत्न स्वातंत्र्याची दिंडी उपक्रमातून करण्यात येत आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्वांनी घरोघरी तिरंगा फडकावून देशाभिमान जपावा. कोणत्याही प्रकारे धाजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेऊन अमृत महोत्सव साजरा करावा. प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे.

– निलेश घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन



जिल्हाभर रॅली
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील विविध 75 गावांमध्ये 75 रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व रॅलींना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांसह नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी रॅलीत सहभागी झाले होते.

Exit mobile version