जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या कारला अपघात

| पनवेल | वार्ताहर |

जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या चारचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी रस्ता दुभाजकाला धडकून अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात चारचाकीमधील दोन गायी व एक बैल अशा तीन जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी पनवेलमध्ये घडली. या अपघातानंतर जनावरांची वाहतूक करणारा चालक पळून गेला असून पनवेल शहर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. फरार चालक आरोपी बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एका चारचाकीमधून तीन जनावरे पनवेल जेएनपीटी मार्गावरून अवैधरीत्या घेऊन जात होता. या वेळी सदर चारचाकी गावदेवी ढाब्याजवळ आली असताना, या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव चारचाकी दुभाजकाला धडकली. यामध्ये चारचाकीमधील तीनही जनावरांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर पडलेल्या तीनही जनावरांचे मृतदेह ताब्यात घेतले. या अपघातानंतर पळून गेलेल्या चालकाविरोधात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Exit mobile version