रसायन वाहून नेणाऱ्या टँकरला अपघात

| पोलादपूर | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर पोलादपूर तालुक्यात प्रथमच केमिकल वाहून नेणारा टँकर आश्चर्यकारकरित्या कलंडला असून सदरचा टँकर रोहे येथील एक्सेल कंपनीतून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड लोटे एमआयडीसीकडे जात असल्याची माहिती प्राप्त झाली.

पोलादपूर तालुक्यात काही वर्षे रासायनिक घनकचरा रस्त्यालगत टाकण्याचा प्रकार होत असे, तर काही वेळा टँकरमधून केमिकल काढून स्टॉक विक्री करण्याचेही धंदे जोर धरू लागले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हे सर्व प्रकार थांबल्याची लक्षणे दिसून येत असताना अचानक बुधवारी (दि.17) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास डीटीसीएल केमिकल घेऊन रोहे येथील एक्सेल कंपनीतून खेड येथील लोटे कंपनीकडे जाणारा टँकर (एमएच-43-वाय-5078) हा पोलादपूर तालुक्यातील पार्ले गावाच्या हद्दीत चौपदरीकरणाच्या रस्त्याचे संरक्षक कठडे संपतात तेथेच आश्चर्यकारकरित्या कलंडला.

या अपघाताबद्दल सहायक पोलीस निरिक्षक युवराज म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप शिरगावकर हे अधिक तपास करीत आहेत. उत्तर प्रदेशातील चालक विजयबहादूर अनंतभगवान यादव (34, नारायणपूर अहिमान, जि. सुलतानपूर) याने याबद्दल फिर्याद दिली आहे. या टँकरमधील डीटीसीएल केमिकल वाहून गेले अथवा अपघातापूर्वीच काढून घेण्यात आले किंवा तसेच टँकरमध्ये राहिले आहे, याबाबत माहिती प्राप्त होऊ शकली नाही.

Exit mobile version