स्वातंत्र्यपूर्व काळातील एक महान क्रांतिकारी नेतृत्व स्व. नारायण नागू पाटील (आप्पासाहेब) यांचे नातू, रायगडचे भाग्यविधाते स्व. प्रभाकर पाटील उर्फ भाऊ यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवलेले त्यांचे सुपुत्र, विद्यमान विधान परिषद सदस्य आमदार भाई जयंत पाटील. ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’ या उक्तीप्रमाणे जयंत भाईंनी लहानपणापासूनच राजकारण व समाजकारणात स्वतःला झोकून दिलं. स्व. भाऊंसोबत ग्रामीण भाग, वाड्या-वस्त्यांवर जाऊन गोरगरीब, आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.
स्व. भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष असल्याने सर्व कामे चुटकीसरशी झाली. रस्ते, पाणी, वीज, शाळा, व्यायामशाळा, तलाव, मंदिरे, समाजमंदिरे, स्मशानभूमी, खेळाची मैदाने, रोजगाराच्या संधी अशी अनेक कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जयंतभाईंनी केली. त्यामुळे रायगडचा विकास गतिमान झाला. रायगड हे राज्यातील विकासाचे मॉडेल बनले. भाऊंना व जयंतभाईंना भेटण्यासाठी रोज सकाळी लोक पेझारी येथे त्यांच्या ‘सुशीला सदन’ या निवासस्थानी गर्दी करु लागले. समस्या कोणतीही असो, भाऊ-भाईंनी कोणाला रिकाम्या हाताने माघारी धाडलेच नाही. काम झाल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते.
मला आठवतंय, 1992 साली अत्यंत नियोजनबद्धरित्या डबघाईला आलेली रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भाईंनी आपल्या ताब्यात घेतली आणि परिस्पर्श व्हावा तसा बँकेचा सुवर्णकाळ सुरू झाला. भाई जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मागील पंचवीस वर्षांत बँकेला उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय व देशपातळीवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. सन 2000 साली जयंतभाईंनी पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. स्वत:च्या उत्पन्नातील पंचवीस टक्के रक्कम त्यांनी दरवर्षी या संस्थेच्या विकासासाठी खर्च केले. आज जवळपास पंचवीस माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा याचबरोबर डी.एड., बी.एड., वरिष्ठ महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, एम.बी.ए. अशा व्यवसायाभिमुख शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. गेल्या पंचवीस वर्षांत संस्थेची संख्यात्मक व गुणात्मक वाढ झाली. हजारो खेड्यापाड्यातील गोरगरिबांची मुले शिकली, नोकरी-व्यवसायाला लागली. याकामी त्यांची स्नुषा सौ. चित्रलेखा पाटील पी.एन.पी. संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. रायगडात सहकार रुजत नाही हा गैरसमज त्यांनी रायगड बाजार माध्यमातून मोडीत काढला. रायगड बाजारचे चेअरमन, भाईंचे सुपुत्र नृपालशेठ उत्तमरित्या काम करीत आहेत.
विधान परिषदेतील भाईंचे काम वाखाणण्याजोगे! भाईंना उत्कृष्ट संसदपटू म्हणून अनेकदा गौरविले आहे. गोरगरीबांचे प्रश्न ते विधिमंडळात पोटतिडकीने मांडताना मी पाहिले आहे. विधिमंडळात त्यांना एक ज्येष्ठ अभ्यासू सदस्य म्हणून मानसन्मान आहे.सर्वपक्षीय लोक त्यांचा नेहमी आदर राखतात. पी.एन.पी. कॅटमरान, कन्स्ट्रक्शन, शिपबिल्डींग, जे.टी. असे अनेक उद्योगधंदे सुरू करुन त्यांनी हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. आमदार भाई जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे मेहुणे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी अलिबागनगरीचा सुनियोजित विकास केला आहे. अलिबागला पर्यटनस्थळ म्हणून नावलौकिक प्राप्त करून दिला आहे. एकेकाळी शेकापची होणारी पडझड रोखत पक्षाचे सरचिटणीस म्हणून भाईंनी पक्षाला नावलौकिक मिळवून दिला. आज गावागावातील युवा पिढी तसेच जुनेजाणते कार्यकर्ते, मतदार जयंतभाईंना मानतात, भाईंवर त्यांची अढळ निष्ठा आहे. अलिबाग येथील शेतकरी भवन येथे भाईंना भेटण्यासाठी शेकडो लोक आतूर असतात.
भाईंच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती सुप्रिया ताई आज अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा आहेत. ही बँक आज यशस्वीरित्या मार्गक्रमण करीत आहे. भाईंच्या चौफेर दूरदृष्टीमुळे, उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे हे सर्व शक्य होत आहे. भाईंनी अलिबागचे वैभव असणाऱ्या पी.एन.पी. नाट्यग्रृहाची निर्मिती केली. आजची दैनिक कृषीवलची भरभराट भाईंच्या कल्पक बुद्धीमत्तेची कमाल आहे. सौ. सुप्रियाताई आणि सौ. चित्रलेखाताई यांच्या सहकार्याने आज कृषीवल यशोशिखरावर पोहोचले आहे.
आमदार भाई जयंत पाटील हे अत्यंत तल्लख बुद्धीचे, करारी, धाडसी, चतुरस्त्र नेते असल्याचा आम्हा समस्त रायगडवासियांना अभिमान आहे. खरे सांगायचं तर, आज माझी आणि माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांची जी आयुष्यात प्रगती झाली आहे, ती केवळ आमदार भाई जयंत पाटील यांच्यामुळेच, हे त्रिवार सत्य आहे. म्हणून मी म्हणेन, जयवंत व्हा… यशवंत व्हा … कीर्तीवंत व्हा तुम्ही… जीवेत शरद: शतम्!
– डॉ. श्रीकांत पाटील