। अलिबाग । वार्ताहर ।
डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या 125 वी जयंतीनिमित्ताने कृषी संजीवनी पंधरवडा 17 जून ते 1 जुलै या कालावधीत उपविभागातील अलिबाग, पेण व मुरुड तालुक्यामध्ये राबविण्यात येणार आहे. शेतकर्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांनी केले.
कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ, कृषी विषयातील तज्ञ, प्रगतशील शेतकरी हे शेतकर्यांना परिपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. 17 जून बीज प्रक्रिया जनजागृती दिन, 18 जून पी.एम. किसान उत्सव दिवस, 19 जून जमिन सुपिकता जागृतीदिन, 20 जून गुणवत्तापूर्ण निविष्ठांची ओळख दिन, 21 जून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, 22 जून पिक विमा जनजागृती दिन, 23 जून हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान प्रसार दिन, 24 जून नाविन्यपूर्ण उपक्रम, सेंद्रीय शेती, नैसर्गिक शेती तंत्रज्ञान 25 जून भात व नागली लागवड तंत्रज्ञान दिन, 26 जून रोजी तूर-कडधान्य लागवड तंत्रज्ञान दिन, 27 जूनला कृषी महिला शेतकरी सन्मान दिन, 28 जून पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना, 29 जून शेतकरी मासिक वाचन दिन व वर्गणीदार वाढविणे, 30 जून रोजी प्रगतशील शेतकरी संवाद दिन, 1 जुलै या कृषी दिनी संजिवनी सप्ताहाची सांगता आहे. लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.






