सैन्यातील एका जवानाला पोलीस कर्मचार्‍यांकडून अमानुषपणे मारहाण

। नवीदिल्ली । वृत्तसंस्था ।
मास्क न घातल्याबद्दल भारतीय सैन्यातील एका जवानाला पोलीस कर्मचार्‍यांनी अमानुषपणे मारहाण केली. झारखंडच्या चतुरा जिल्ह्यातील मयूरखंड पोलीस स्टेशन परिसरातील कर्माबाजारात ही घटना घडली असून या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ फुटेजमध्ये पवनकुमार यादव या जवानाला पोलिसांच्या टीमने मारहाण केल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या या कृत्याविरोधात लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी एका पोलीस कर्मचार्‍यांसह दोन अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चतरा येथे लोक कोरोनाच्या नियमांचे पालन आणि मास्कबद्दल पोलिसांकडून तपासणी सुरू होती. याचवेळी जवळच्या आरा-भुसाही गावातील रहिवासी आणि सैन्यातील जवान पवनकुमार यादव आपल्या दुचाकीवर तिथे पोहोचले. तेव्हा ऑनडयुटी असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना अडवले आणि हवालदार संजय बहादूर राणाने दुचाकीची चावी काढून घेतल्या. जवानाने विरोध केला असता पोलीस कर्मचार्‍यांनी त्याला लाथा -बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रकरणात विरोधाभास असा की, मास्क न घातल्यामुळे मारहाण करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांनी स्वतःदेखील मास्क घातलेले नव्हते. दरम्यान, स्थानिकांनी मध्यस्थी करत जवानाला वाचवल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. परिसरात घटनेचा विरोध करण्यात आल्याने पोलीस निरीक्षक राकेश रंजन यांनी दखल घेत प्रकरणाचा तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Exit mobile version