रांगोळी कलाकारांचा कलात्मक आविष्कार

| चिरनेर | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील अजिवली येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त, रंगछंद कलाकार पनवेल यांचे भव्य रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. रांगोळी प्रदर्शन 8 जानेवारीपासून सुरू झाले असून, ते 15 जानेवारीपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. दरम्यान हे रांगोळी प्रदर्शन पाहण्यासाठी पनवेल तालुक्यातील भाविकांची मोठी रीघ लागली आहे. या कलाकारांच्या कलेचे परिसरात जाणकारांकडून तोंड भरून कौतुक होत आहे.

अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यामुळे रंग छंदच्या कलाकारांनी देखील रांगोळी प्रदर्शनात रामायणाचा विषय घेऊन रामायणातील कथेवर आधारित चित्रकृतीच्या देखाव्यातून सौंदर्यपूर्ण व बोलक्या कलात्मक रांगोळ्या रेखाटल्या आहेत. विशेषता रंगछंदच्या या रांगोळीकारांनी तर आपल्या कल्पकतेतून, रांगोळीच्या माध्यमातून श्रीरामाची भव्य प्रतिकृती साकारून, आपल्या मूर्तिमंत कलेचा साक्षात्कार घडविला आहे. या रांगोळीतून एका बाजूने पाहिले असता श्रीरामाची प्रतिकृती दिसत आहे.

दुसऱ्या बाजूने पाहिले असता श्री हनुमानाची मूर्ती नजरेत भरत आहे. एकूण 22 रांगोळी कलाकारांनी रामायणातील विविध भावछटा साकारल्या आहेत. यात साकारण्यात आलेल्या रामायणातील महापुरुषांच्या हुबेहूब व्यक्तिरेखा नजरेत भरणाऱ्या आहेत. रंग छंदचे प्रमुख रांगोळीकार रोशन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरविण्यात आलेल्या या रांगोळी प्रदर्शनात योगेश डाकी, करिष्मा राणे, ज्ञानेश्वरी बहिर, रोहित भोईर, मनोहर ठाकूर, मधुरा भोईर, विराज हेमष्टे, अमोल खानावकर, नम्रता गोंधळी, रवींद्र चौधरी, कामिनी पाटील, मयुरी हरड, सायली पाटील, हेतल म्हात्रे, मिताली सुर्वे, ज्योती पाटील, स्वप्निल गायकर, पद्मिनी खाडे, प्रणिता शिंदे, संदेश आमले, शुभम कुमरे, राजेंद्र पाटील, गितेश पाटील, संध्या राणे, शैलेश पाटील आदी रांगोळी कलाकारांनी आपल्या कलेचा अविष्कार आपल्या रांगोळी कलेतून साकारला आहे.

Exit mobile version