। कल्याण । प्रतिनिधी ।
पती-पत्नीला जिवंत जाळण्यासाठी घरावर पेट्रोल ओतून घराला आग लावल्याचा प्रकार भिवंडीतील निजामपुरा परिसरातील कुरेशीनगरमध्ये घडला आहे. या आगीत दोघेही पती-पत्नी जखमी झाले असून त्यांना इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारेकर्यांनी घराला आग लावण्यापूर्वी दरवाजाची कडी बाहेरून लावून घेतली. आग निदर्शनास आल्यानंतर या पती-पत्नीने आरडाओरड केली. त्यामुळे शेजारी मदतीला आल्याने मोठा अनर्थ टळला, अन्यथा घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन या वस्तीत मोठा आगडोंब उसळला असता.
आसिफ कुरेशी आणि फरीन कुरेशी या पती-पत्नीच्या घरावर मारेकर्यांनी मध्यरात्री सुमारे साडेतीनच्या सुमारास पेट्रोल टाकून आग लावली. त्यानंतर मारेकर्यांनी दरवाजाची बाहेरून कडी लावली आणि ते पळून गेले. आग भडकल्यानंतर घरात धूर जमा झाल्याने झोपेत असलेले दोघे पती- पत्नी जागे झाले. त्या दोघांनी दरवाजाने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा बाहेरून बंद असल्याने दोघांनीही आरडाओरड केली. त्यामुळे शेजारी जागे झाले. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. या आगीत आसिफ आणि फरीन जखमी झाले. शेजार्यांनी त्यांना इंदिरा गांधी स्मृती शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तौकीर व त्याच्या साथीदारांनी ही आग लावल्याचा आरोप आसिफ यांनी केला आहे. तीन महिन्यांत पूर्वी तौकीर व त्याच्या साथीदारांनी आसिफ याचा मेव्हणा अनिस व त्याच्या कुटुंबीयांना क्षुल्लक वादातून मारहाण केली होती. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घे, नाहीतर तुमचे कुटुंब संपवून टाकू अशी धमकी आरोपी यांनी दिली होती.
दांपत्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
